पुतिन युक्रेनवर रासायनिक आणि जैविक शस्त्रे यांद्वारे आक्रमण करू शकतात ! – बायडेन

रासायनिक शस्त्रे

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांना युक्रेनविरोधातील युद्धात पराभूत व्हावे लागू नये, यासाठी ते रासायनिक आणि जैविक शस्त्रे यांद्वारेही आक्रमण करू शकतात. अमेरिका रशियावर अत्यधिक तीव्रतेचे निर्बंध लादत असल्याने रशिया अमेरिकेवर ‘सायबर आक्रमणे’ही करू शकतो, असेही बायडेन म्हणाले.

(सौजन्य : OpIndia)

रशियाकडून ओडेसा शहरावर आक्रमण करण्यास आरंभ !

दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी दावा केला आहे की, युक्रेनी सैन्याच्या कारवायांमुळे रशियन सैन्याच्या पुढे सरकण्याच्या गतीवर परिणाम झाला आहे. असे असले, तरी युक्रेनी सैन्याने म्हटले की, गेल्या २४ घंट्यांत रशियाने युक्रेनच्या हवाई क्षेत्रावर स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न वाढवले आहेत.

रशियन नौदलाने ओडेसा या समुद्रकिनारी वसलेल्या शहरावर आक्रमण करण्यास आरंभ केला आहे. जर रशियाने या शहरावर नियंत्रण मिळवले, तर युक्रेनचा काळ्या समुद्राशी असलेला संबंध तुटणार आहे.

झेलेंस्की यांनी पुतिन यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना आवाहन केले आहे. ‘चर्चेखेरीज युद्धाला पूर्णविराम मिळणे शक्य नाही’, असे ते म्हणाले.