सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला बंगाल आणि कोल्हापूर (महाराष्ट्र) येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि साधक या सर्वांपर्यंत गुरुमाऊलींची ज्ञानगंगा पोचली. गुरुदेवांची ज्ञानशक्ती आणि संतांचे लाभलेले मार्गदर्शन यांतून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा लाभ घेण्यासाठी समाजातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी, वाचक अन् हितचिंतक मोठ्या संख्येने अभियानात कृतीशील सहभाग घेत आहेत. ‘हा प्रतिसाद पाहून गुरुदेवांची ज्ञानगंगा प्रवाहित होऊन सर्व जण त्या चैतन्यात न्हाऊन निघत आहेत’, अशी अनुभूती सर्वांनी घेतली.
श्री. सियाराम साहा, कोलकाता, बंगाल.
१. मित्र, वाचक आणि जिज्ञासू यांना भ्रमणभाषवर संपर्क करणे अन् त्यांनी विषय लक्षपूर्वक ऐकून ग्रंथांची सूची पाठवण्यास सांगणे
‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’चा शुभारंभ झाल्यावर आरंभी १५ – २० दिवस मी परिचित, मित्र, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक, हिंदु जनजागृती समितीच्या संकेस्थळाला भेट देणार्या व्यक्ती (प्रोफाइल मेंबर्स), अशा ६० जणांना भ्रमणभाषवर संपर्क केला. (कोरोना महामारीमुळे त्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नव्हते.) मी त्यांना ‘या अभियानाचा उद्देश, ग्रंथांचे महत्त्व, त्यांतून मिळणारे चैतन्य आणि लाभ’, यांविषयी सांगितले. त्यांतील बर्याचशा व्यक्तींनी माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. त्यांनी सांगितले, ‘‘ग्रंथांची सूची पाठवून द्या. ती पाहून सांगतो.’’
२. परात्पर गुरुदेवांच्या असीम कृपेमुळे ‘अपेक्षा करणे आणि निराशा येणे’ या स्वभावदोषांवर मात करता येऊन सेवेतील आनंद घेता येणे
मी माझ्या मनातील विचारांचे निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘व्यक्तींना संपर्क करण्यापूर्वीच ‘त्यांनी ग्रंथ घ्यायला हवेत’, अशी माझी अपेक्षा असायची आणि त्यांच्याकडून अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळाला नाही, तर मला निराशा येत होती.’ नंतर गुरुदेवांच्या कृपेने माझ्या लक्षात आले, ‘ईश्वराने ज्या व्यक्तींना आधीपासूनच निश्चित केले आहे, त्यांच्याकडे दैवी ज्ञानरूपी ग्रंथ जातील. मी ईश्वराच्या या कार्यातील केवळ एक माध्यम आहे. ईश्वराने या सेवेची संधी आपल्या उद्धारासाठी दिली आहे.’ या विचाराने प्रेरित होऊन मी परात्पर गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना केली आणि संपर्क करणे चालू ठेवले.
‘अपेक्षा करणे आणि निराशा येणे’ इत्यादी स्वभावदोष मुळासह नष्ट व्हावेत’, यासाठी मला गुरुदेवांनी सांगितलेल्या स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचे साहाय्य झाले. त्यामुळे माझ्या मनातील अपेक्षा आणि निराशा न्यून झाली अन् माझी सेवा उत्साहाने होऊ लागली.
आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), कोल्हापूर
१. हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण पाटील यांनी स्वतःच्या विवाहप्रसंगी नातेवाइकांना लघुग्रंथ भेट देणे
नवे पारगाव येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण पाटील यांनी त्यांच्या विवाहप्रसंगी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा कक्ष लावण्याच्या संदर्भात स्वतःहून विचारणा केली अन् ग्रंथप्रदर्शन लावले. त्यांना ग्रंथांचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी विविध विषयांवरील लघुग्रंथ खरेदी करून नातेवाइकांना भेट दिले.
२. धर्मप्रेमी श्री. चारुदत्त पोतदार यांनी ‘हिंदु युवतींना ‘लव्ह जिहाद’चे गांभीर्य लक्षात यावे’, यासाठी ते ग्रंथ भेट देण्यासाठी घेणे
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथील धर्मप्रेमी श्री. चारुदत्त पोतदार यांनी त्यांचा मुलगा श्री. इंद्रजित याच्या विवाह सोहळ्यात अध्यात्मप्रसार होण्यासाठी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्याचा मानस व्यक्त केला. श्री. चारुदत्त पोतदार यांनी ‘हिंदु युवती आणि महिला यांना ‘लव्ह जिहाद’चे गांभीर्य लक्षात यावे’, यासाठी ‘लव्ह जिहाद’चे ग्रंथ भेट देण्यासाठी घेतले.
३. कोल्हापूर येथील ‘मारुति ग्लास’चे मालक श्री. नारायण डोंबे यांनी लघुग्रंथ घेऊन ते पणुंद्रे येथील ‘जुगाईदेवी हायस्कूल’ येथील पालक मेळाव्यात वितरित केले.
४. वाडीचरण (तालुका शाहूवाडी) येथील ज्ञानेश्वर वाचनालयाचे प्रमुख श्री. बाबासाहेब चौगुले यांनी ग्रंथसूची पाहून विविध विषयांवरील ग्रंथांची मागणी दिली.’
५. कृतज्ञता
परात्पर गुरुदेवांच्या असीम कृपेमुळेच मला ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या सेवेतील आनंद घेता आला’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.