ब्राह्मण समाजातील ७५ टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा अल्प !

  • ब्राह्मण समाजाचे सर्वेक्षण

  • राज्यातील ४ सहस्र लोकांचे २१ संघटनांकडून सर्वेक्षण !

संभाजीनगर – महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या जेमतेम ६ ते ७ टक्के भाग असणार्‍या ब्राह्मण समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचे संघटनांच्या वतीने नुकतेच राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात या समाजाची अवस्था बिकट असल्याचा प्रमुख निष्कर्ष समोर आला आहे. समाजातील बहुतांश नागरिकांना हक्काचे घर नाही. जेमतेम लोकांकडेच शेती आहे. बहुतांशी नागरिकांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांच्या आत आहे. उपजीविकेच्या शोधात शहराकडे स्थलांतर केल्याने राज्यातील ४५ सहस्रपैकी २२ सहस्र खेड्यांत ब्राह्मणांची घरेच नाहीत.

ब्राह्मण महासंघ, परशुराम सेवा संघ, अखिल भारतीय पेशवा संघटना, बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद, ब्राह्मण सेवा संघ यांसह २१ संघटना सर्वेक्षणात सहभागी झाल्या होत्या. त्या वेळी ४ सहस्र ब्राह्मण लोकांशी संवाद साधण्यात आला. परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे आणि ब्राह्मण महाशिखर परिषदेचे अध्यक्ष निखिल लातूरकर यांनी सर्वेक्षण अहवाल सिद्ध केला.

ब्राह्मण समाजातील फक्त ७.१ टक्के लोकांकडे चारचाकी, तर ५५.३ टक्के नागरिकांकडे दुचाकी आहे. १३.२ टक्के लोकांकडे कार आणि दुचाकी आहे. २४.४ टक्के लोकांकडे एकही वाहन नाही. हा वर्ग सार्वजनिक वाहनाने प्रवास करतो.

पीडितांकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

समाजातील १३ टक्के नागरिक विविध प्रकारच्या जातीय द्वेषामुळे होणार्‍या अत्याचाराने पीडित आहेत. समाजातील महापुरुषांविषयी सातत्याने अवमान झाल्याची सल मनात रहाते. समाजातील नागरिक, संत आणि महापुरुष यांच्याविषयी सामाजिक माध्यमांवर टिंगलटवाळी चालू असते. याची पोलिसांत तक्रार करूनही कुणी नोंद घेत नाहीत, असे ब्राह्मण समाजातील नागरिकांनी सांगितले.

प्रमुख निष्कर्ष

४५ टक्के नागरिकांकडे स्वत:चे घर आहे. हा वर्ग प्रामुख्याने ग्रामीण भागात माती आणि पत्रे अशा घरांत रहातो. शहरी भागातील लोकांनी कर्ज काढून घर घेतले आहे. ५५ टक्के लोक भाड्याच्या घरात रहातात. त्यांची घरे पुष्कळ लहान आहेत.

स्थैर्यासाठी शासनाचे सहकार्य आवश्यक !

‘ब्राह्मण समाज प्रचंड अडचणीत जगत आहे. कुळ कायदा आणि सीलिंग ॲक्ट लावून सरकारने भूमी हिसकावून घेतल्याने समाज चरितार्थासाठी शहरात स्थलांतरित झाला; पण पैसा नसल्याने व्यवसाय करता येत नाही. पूर्वीसारख्या नोकर्‍याही नाहीत. तरी सोशिक स्वभावामुळे आहे, त्या परिस्थितीत समाज जगत आहे. शासनाने या समाजाला स्थैर्य देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. – विश्वजित देशपांडे, प्रदेशाध्यक्ष, परशुराम सेवा संघ

८२ टक्के लोक भूमीहिन, २२ सहस्र खेड्यांतून बाहेर !

ब्राह्मण समाजातील ८२.३ टक्के लोकांकडे शेतीचा तुकडाही नाही. १७.७ टक्के नागरिकांकडे थोडी फार शेती आहे; परंतु बहुतांशी लोक शेती करत नाहीत. ब्राह्मण समाजातील लोकांची २३ सहस्र खेड्यांत तुरळक घरे आहेत.

ग्रामीण भागात पौरोहित्य हाच व्यवसाय !

स्वातंत्र्यानंतर सरकारी नोकर्‍यांत ब्राह्मणांची लक्षणीय संख्या होती. आता एकूणच सरकारी नोकर्‍यांची संख्या घटली असून यात ब्राह्मण समाज केवळ ३ टक्के उरला आहे. ५० टक्के लोक खासगी क्षेत्रात नोकरी करतात, तर ४७ टक्के व्यवसायात आहेत. हा व्यवसाय प्रामुख्याने पौरोहित्य किंवा लहान-सहान दुकान यांच्या स्वरूपात आहे, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

ब्राह्मण समाजाच्या ८ मागण्या…

१. ब्राह्मण समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा.
२. स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावे.
३. ७५ सहस्र छोट्या मंदिरांत पुरोहित नेमून त्यांना प्रतिमास ५ सहस्र रुपयांचे मानधन द्यावे.
४. वर्ग २ भूमी वर्ग १ करून मालकीच्या करून द्याव्यात.
५. महापुरुषांच्या अपर्कीतीविरुद्ध कायदा
६. प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावे.
७. समाजाला हिणवणार्‍यांवर ‘ॲट्रॉसिटी’ची तरतूद करावी.
८. आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावे.