‘एकदा एका सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन केले. त्यातील काही सूत्रे पुढे दिली आहेत.
१. ‘देवाला ‘इदं न मम ।’ (हे माझे नाही.), अशी प्रार्थना करणे’, ही फार उच्च टप्प्याची साधना आहे !
‘देवाला पैसे अर्पण करतांना ‘हे पैसे देवाचेच आहेत’, तसेच ‘काही खातांना हे शरीर देवाचेच आहे’, असा भाव ठेवावा. सर्वकाही भगवंताचे आहे. हे पुढच्या टप्प्याचे आहे. आपण देवाचे नाव घेतो आणि ते देवालाच देतो, तसेच हे आहे. ‘भगवंता, शरीर आणि पैसा हे सर्वकाही तुझेच आहे अन् हे तुलाच अर्पण करून घे’, अशी प्रार्थना करणे, ही फार उच्च टप्प्याची साधना आहे.
२. (कै.) पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांचे ग्रंथ समाजातील सर्वसामान्य लोकांसाठी असून तन, मन आणि धन यांचा त्याग करून समष्टी सेवा करणार्या साधकांनी समष्टी सेवेलाच प्राधान्य द्यावे !
मी : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये येत असलेले (कै.) पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांचे लेख वाचतांना चांगले वाटते. त्यांचे लिखाण समजायला सोपे आहे. त्यांचे लिखाण सर्वसामान्य व्यक्तींना समजेल, अशा प्रकारचे असल्याने वाचायला आवडते; पण ते वाचतांना ‘मी अध्यात्मापासून फारच दूर आहे’, याची जाणीव होऊन त्यांनी म्हटल्याप्रमाणे ‘मी एवढे अंतर गाठू शकत नाही’, असा विचार येऊन मला ताण येतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : (कै.) पू. बांद्रे महाराज यांचे ग्रंथ हे समाजातील सर्वसामान्य लोकांसाठी आहेत. ‘सर्वसामान्य लोकांनी साधना करावी’, या दृष्टीने ते ग्रंथ लिहिलेले आहेत. तू तन, मन आणि धन यांचा त्याग करून इतकी वर्षे आश्रमात आहेस, म्हणजे तू पुढच्या टप्प्याची समष्टी साधना करत आहेस. तुझ्या मनात ‘ईश्वराचे कार्य अधिकाधिक वाढावे’, असा विचार असतो. त्यामुळे त्यांचे ग्रंथ तुझ्यासाठी नाहीत. देव तुला साधनेत साहाय्य करतो ना ? केवळ नामजप करण्याने प्रगती अल्प होते; मात्र समष्टी सेवा केल्याने प्रगती जलद होते. त्यामुळे तू समष्टी सेवाच कर.’
– श्री. राहुल कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.