त्याग आणि निरपेक्षता असलेल्या सनातनच्या ११७ व्या संत फोंडा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) यांच्या सन्मान सोहळ्यातील क्षणमोती !
जशी सूर्यनारायणाच्या आगमनाने फुले उमलती । तशी परात्पर गुरुदेवांच्या अस्तित्वाने संतपुष्पे फुलती ।
रथसप्तमीच्या दिनी येई गुरुतेजाची अनुभूती । पू. सुधा सिंगबाळ यांच्या रूपे सनातन संतमाला बहरली ।।
रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवतेच्या पूजनाचा दिवस ! या दिवसापासून सूर्य स्वतःच्या रथात बसून उत्तरायणात मार्गक्रमण करतो. सूर्य हे भगवान नारायणाचे एक रूप असून त्याला ‘सूर्यनारायण’ म्हटले जाते. सूर्य जसा अंधकार नष्ट करतो आणि चराचर सृष्टीला प्रकाश प्रदान करतो, त्याप्रमाणे श्रीमन्नारायणस्वरूप असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले हे साधकांच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून साधकांना ज्ञानरूपी प्रकाश देणारे ज्ञानगुरु आणि तेजोमय गुरु आहेत. अशा तेजोमय परात्पर गुरुदेवांनी रथसप्तमीच्या दिवशी म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी अपार कृपेचा आणि आनंदाचा दुग्धशर्करायोग जुळवून आणला. हा दुग्धशर्करायोग म्हणजे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांच्या आई श्रीमती सुधा उमाकांत सिंगबाळ (वय ८२ वर्षे) या ‘व्यष्टी संत’ म्हणून सनातनच्या ११७ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता परात्पर गुरु डॉक्टरांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (श्रीमती सुधा सिंगबाळ यांची सून) यांनी दिली. त्यासमवेतच सिंगबाळ कुटुंबियांच्या घराचे दायित्व ममतेने सांभाळणार्या सुश्री (कु.) कला खेडेकर (वय ५३ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचेही घोषित करण्यात आले.
या मंगलप्रसंगी पू. नीलेश सिंगबाळ यांनी पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांना पुष्पहार अर्पण करून आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला, तर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सुश्री (कु.) कला खेडेकर यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांचा नातू श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ (वय २४ वर्षे) आणि अन्य काही साधक उपस्थित होते.
शांत, स्थिर, त्यागी वृत्तीच्या आणि देवाप्रती श्रद्धा अन् भाव असलेल्या पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ !
‘मूळच्या सावईवेरे, गोवा येथील श्रीमती सुधा उमाकांत सिंगबाळ सनातनचे संत पू. नीलेश सिंगबाळ यांच्या मातोश्री असून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सासूबाई आहेत. श्रीमती सुधा सिंगबाळ पहिल्यापासूनच धार्मिक आणि आतिथ्यशील वृत्तीच्या आहेत.
पू. नीलेश सिंगबाळ मागील अनेक वर्षांपासून धर्मप्रसारासाठी वाराणसी येथे रहात आहेत, तर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ रामनाथी आश्रमात राहून सेवा करतात. श्रीमती सिंगबाळ यांनी या दोघांना सेवा आणि साधना करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. ‘मुलगा आणि सून यांनी जवळ राहून आपली सेवा करावी’, अशी कोणतीही अपेक्षा त्यांनी कधी केली नाही. ‘त्यागी आणि निरपेक्ष वृत्ती’ हे श्रीमती सिंगबाळ यांचे वैशिष्ट्य असून त्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. अनेक शारीरिक व्याधी असूनही त्यांनी देवावरील श्रद्धेच्या बळावर सर्व कठीण प्रसंगांना तोंड दिले.
शांत, स्थिर आणि त्यागी वृत्ती या गुणांमुळे वर्ष २०१५ मध्ये त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. देवावरील श्रद्धा आणि अनुसंधान वाढल्यामुळे आताही त्यांची आध्यात्मिक उन्नती झपाट्याने होत असून त्यांच्या देहात अनेक दैवी पालट झाले आहेत. हे सर्व पालट त्या संतपदी पोचल्याचेच द्योतक आहेत. मला सांगण्यास अतीव आनंद होत आहे की, श्रीमती सुधा सिंगबाळ ‘व्यष्टी संत’ म्हणून सनातनच्या ११७ व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत.
एकाच परिवारातील तिघे जण संतपदी पोचणे, ही एक अलौकिक घटना आहे. त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण असलेला सिंगबाळ परिवार सर्व साधकांसाठी आदर्शवत् आहे. पू. सुधा सिंगबाळ यांचा नातू श्री. सोहम् (वय २४ वर्षे) हा बालवयापासून साधना करत असून त्याचीही आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे.
‘प्रत्येक परिस्थितीला आनंदाने तोंड देणार्या पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.२.२०२२)
असे उलगडले गोड गुपित !
रथसप्तमीच्या निमित्ताने पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांची सेवा करणारे काही साधक पू. आजींना भेटायला घरी गेले होते. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. आजींकडे सेवेला जाणार्या साधकांना ‘घरी सेवेसाठी आल्यावर काय जाणवते ?’, असे विचारले. तेव्हा साधकांनी ‘पू. आजींकडून काय शिकायला मिळाले ?’, यासंदर्भात काही सूत्रे सांगितली. साधकांच्या अनुभवांतून श्रीमती सुधा सिंगबाळ यांच्यातील प्रीती, निरपेक्षता, इतरांचा विचार आदी गुण उलगडले. या वेळी उतारवयातही स्वतः त्यागमय जीवन जगून इतरांवर प्रीती करणार्या श्रीमती सुधा सिंगबाळ या संतपदी विराजमान झाल्याचे गोड गुपित श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी उलगडले.
सर्व काही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच कृपा आहे ! – पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांचे हृद्य मनोगत
सत्संगाच्या वेळी पू. आजी भावावस्थेत असल्याने आणि वयोमानामुळे मनोगत व्यक्त करू शकल्या नाहीत; पण सोहळा झाल्यानंतर पू. नीलेश सिंगबाळ यांच्याशी बोलतांना पू. आजी अत्यंत कृतज्ञतेने म्हणाल्या, ‘‘आपण खरे तर अत्यंत सामान्य आहोत. कोणी आपल्यावर एवढी कृपा केली असती ? परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे सर्व झाले. सर्व काही त्यांचीच कृपा आहे.’’
पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांच्याविषयी कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत !
त्यागी वृत्ती आणि देवाप्रती भाव हे गुण पू. आईंमध्ये पूर्वीपासूनच अनुभवता येतात ! – पू. नीलेश सिंगबाळ (मुलगा)
आई पूर्वीपासूनच प्रत्येक परिस्थितीमध्ये अत्यंत त्यागमय जीवन जगल्या आहेत. मी उत्तर भारतात धर्मप्रसारसेवा करत असल्याने वर्षातून एकदाच घरी येतो; पण मी घरी आल्यावर ‘माझ्यासाठी काय करू ?’, असाच आईंचा विचार असतो. ‘मी त्यांच्यासाठी काही करावे’, असे त्यांना वाटत नाही.
त्याग आणि निरपेक्षता यांमुळे परात्पर गुरुदेवांनी पू. आईंची आंतरिक साधना करवून घेतली ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (सून)
माझे लग्न होऊन मी घरात आल्यापासूनच सून म्हणून त्यांची माझ्याकडून कोणतीही अपेक्षा किंवा तक्रार नसते. त्या भरभरून कौतुक करून मला साहाय्य करतात. पूर्वीपासून कुलदेवतेची उपासना, साधनेच्या आरंभी प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी अनुसंधान आणि आता परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा असा पू. आईंचा साधनाप्रवास झाला. गेल्या दोन-तीन मासांमध्ये त्यांच्यामध्ये गतीने परिवर्तन झाले. त्याग आणि निरपेक्षता यांमुळे परात्पर गुरुदेवांनी पू. आईंची आंतरिक साधना करवून घेतली.
पू. आजींच्या बोलण्यात नेहमी परात्पर गुरु डॉक्टरांचेच नाव असते ! – श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ (नातू)
पू. आजी माझ्या आईकडे (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याकडे) आध्यात्मिक दृष्टीकोनातून बघतात. गेल्या काही कालावधीपासून पू. आजींची श्रद्धा आणि भाव वाढला आहे. त्यांच्या बोलण्यात सतत परात्पर गुरुदेवांचेच नाव असते. दळणवळण बंदी चालू झाल्यापासून आम्ही (मी आणि आई) आम्ही आश्रमातच रहातो. ‘आम्ही प्रतिदिन घरी येऊ शकत नाही’, हे पू. आजींनी पूर्णपणे स्वीकारले आहे. ‘तू तुझ्या साधनेकडे लक्ष दे’, असे त्या मला नेहमी म्हणतात.
वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे
१. साधक पू. आजींच्या सहवासात जाणवलेली गुणवैशिष्ट्ये सांगत असतांना पू. आजी साधकांना सुश्री (कु.) कला खेडेकर यांची गुणवैशिष्ट्ये सांगण्याविषयी सांगत होत्या. पू. आजी त्यांचे संतपद घोषित केल्यानंतरही स्थिर होत्या; परंतु सुश्री (कु.) कला यांची आध्यात्मिक उन्नती झाल्याचे कळल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला.
२. या सोहळ्यापूर्वीपासूनच विविध माध्यमांतून आनंदाची अनुभूती येत होती. सोहळा चालू झाल्यानंतर उत्तरोत्तर हा आनंद अधिकाधिक प्रमाणात जाणवू लागला. ‘हा आनंदाचा सोहळा अनुभवण्यासाठी सनातन संस्थेचे सर्व साधक सूक्ष्मातून कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना जाणवले.
३. पू. आजींची शारीरिक स्थिती कठीण असूनही सोहळ्याच्या निमित्ताने त्या सलग ३ घंट्यांहून अधिक काळ बसून साधकांशी संवाद साधत होत्या. त्यांच्याकडे पाहून ‘त्या रुग्णाईत आहेत’, असे जाणवतच नाही.
सुश्री (कु.) कला खेडेकर यांच्या आध्यात्मिक उन्नतीचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत. |