संपादकीय
गांधीवाद गुंडाळून ठेवणारी काँग्रेस आणि अन्य निधर्मी पक्ष ढोंगीच होत !
जानेवारीला मोहनदास गांधी यांची पुण्यतिथी होती. या दिवशी देशभरात गांधी यांच्यापेक्षा पंडित नथुराम गोडसे यांच्याविषयीच अधिक चर्चा झाल्याचे दिसून आले. ‘याला काय म्हणायचे ?’, याचा विचार प्रत्येक देशवासियाने केला पाहिजे; कारण गांधी यांच्याविषयी संवेदना व्यक्त करण्यात आल्या, तरी ‘या देशातील लोकांच्या मनामध्ये पंडित नथुराम गोडसे यांच्याविषयी कुठेतरी काहीतरी भावना आहे’, हे लक्षात घ्यायला हवे. यातूनच मग गोडसे यांच्याविषयीची चर्चा होते. त्यांच्यावर टीका जरी झाली, तरी चर्चा होते, हे लक्षात घ्यायला हवे. गांधी यांच्यानंतर देशात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याही हत्या झाल्या; मात्र त्यांच्या मारेकर्यांची चर्चा तितकी होत नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. ‘गांधींऐवजी गोडसे यांना मोठे केले जात आहे’, अशी फुकाची टीका गांधीवाद्यांकडून केली जाते; मात्र गोडसे यांच्याविषयी चर्चा करण्यात गांधीवादीच आघाडीवर असतात, हेही तितकेच खरे ! ‘गोडसे यांना दूषणे देऊन गांधी यांना मोठे करण्याचा प्रयत्न गांधीवाद्यांकडून केला जातो; मात्र त्यातून गांधीवादाचा फोलपणा समोर येतो, हे गांधीवाद्यांच्या लक्षात येत नाही, हेही तितकेच खरे !
नथुराम गोडसे यांनी गांधी यांची हत्या करण्यापूर्वीही गांधी यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्यात नथुराम यांचा सहभाग नव्हता, हा इतिहास आहे. याची सर्व माहिती सरकार दफ्तरी आहे. यावर कधी चर्चा होतांना दिसत नाही. गांधी यांच्या हत्येविषयी विविध दावेही केले जातात. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी गांधी हत्येचे अन्वेषण करण्याची मागणी पुन्हा केली आहे. त्यांचे म्हणणे आहे, ‘पंडित नथुराम गोडसे यांनी ‘गांधी यांना ३ गोळ्या मारल्या होत्या’, असे जबानीत सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात गांधी यांच्या शरिरातून ४ गोळ्या बाहेर काढण्यात आल्या. तर मग चौथी गोळी त्यांना कुणी मारली ? हे त्या वेळी का शोधण्यात आले नाही ?’ डॉ. स्वामी यांनी केलेल्या चौथ्या गोळीचा उल्लेख पोलिसांच्याच अहवालात असल्याचे म्हटले आहे. ‘गांधी यांची हत्या व्हावी’, असे नथुराम गोडसे यांच्या व्यतिरिक्त कुणाला वाटत होते, हे समोर आणले पाहिजे’, ही डॉ. स्वामी यांची मागणी आहे. डॉ. स्वामी यांच्यासारखी व्यक्ती अशा प्रकारची मागणी करत असेल, तर त्याचा भाजप सरकारने विचार करणे आवश्यक आहे. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने ते जाणीवपूर्वक टाळले असणार यात शंका नाही; मात्र ‘आताच्या सरकारने ते करावे’, असे कुणी म्हटल्यास ते अयोग्य ठरू नये.
ढोंगी गांधीवादी काँग्रेस !
‘गांधी यांची हत्या हिंदुत्वनिष्ठाने केली’, असे ट्वीट करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली. पंडित नथुराम गोडसे पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आणि नंतर हिंदु महासभेमध्ये होते. त्यांचे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संबंध होते, हा इतिहास आहे. याचा दुसरा भाग पहाणेही आवश्यक आहे. पंडित नथुराम गोडसे या हिंदुत्वनिष्ठाने मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवले आहे, ‘सिंधु नदीविना भारत अपूर्ण आहे. ज्या दिवशी सिंधु नदी पुन्हा भारतात येईल, तेव्हा माझ्या अस्थींचे त्यामध्ये विसर्जन करावे.’ अशा प्रकारची इच्छा आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने, संरक्षणमंत्र्याने, काँग्रेसच्या एकाही नेत्याने कधी त्याच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलेली नाही, याचा विचार जनता करत असणार, यात शंका नाही. देशातील एका वर्गाला ‘पंडित नथुराम गोडसे हे प्रखर देशभक्त होते’, असे वाटते, हे नाकारता येणार नाही. ते ब्राह्मण होते; म्हणून काही वर्गांकडून त्यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. केवळ पंडित नथुराम गोडसे हिंदुत्वनिष्ठ होते, यामुळेच त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गेली ७५ वर्षे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना काँग्रेस आणि अन्य ढोंगी निधर्मीवादी अन् गांधीवादी पक्षांनी लक्ष्य केले आहे आणि करत आहेत. ‘गांधी यांचा वारसा जणू आम्ही चालवत आहोत’, असे दाखवण्याचा ते प्रयत्न करत असतात. स्वतःला गांधीवादी म्हणणार्या काँग्रेसने गांधी यांच्या हत्येनंतर देशात, विशेषतः महाराष्ट्रात ब्राह्मणांवर आक्रमणे करून त्यांच्या हत्या केल्या, त्यांच्या घरादारांची लूट केली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देहलीमध्ये साडेतीन सहस्र शिखांची हत्या काँग्रेसवाल्यांकडून करण्यात आली, असाही आरोप आहे. शिखांच्या हत्येचे समर्थन राजीव गांधी यांनीच केले होते, याविषयी त्यांचे पुत्र राहुल गांधी कधी बोलत नाहीत, हे जनतेला ठाऊक आहे. ‘नथुराम गोडसे यांना सातत्याने लक्ष्य करून ‘आम्ही धुतल्या तांदुळासारखे आहोत’, असे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात, हेही जनतेला ठाऊक आहे. गांधी यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘काँग्रेसला विसर्जित करा’, असे म्हटले होते; मात्र भ्रष्ट आणि सत्तालोलुप काँग्रेसवाल्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून पक्ष कायम ठेवत सत्तेची फळे अनेक दशके चाखली. देशाची लुबाडणूक केली. गांधी यांच्या मुसलमानांच्या लांगूलचालनाच्या धोरणाव्यतिरिक्त काँग्रेसने त्यांच्या कोणत्याही विचारांचे पालन केले नाही. गांधी यांचे ‘अहिंसा’, ‘सविनय’, हे शब्द तर काँग्रेसवाल्यांच्या शब्दकोशातही राहिलेले नाहीत. तमिळनाडूमध्ये काँग्रेसला तमिळांची मते मिळावीत; म्हणून गांधी परिवार राजीव गांधी यांच्या हत्येतील शिक्षा झालेल्या तमिळी गुन्हेगारांविषयी मवाळ भूमिका घेत असतात, हेही जनतेने पाहिलेले आहे. ‘हे मारेकरी हिंदुत्वनिष्ठ नाहीत’, हे लक्षात घ्यायला हवे. गांधी म्हटले की, पंडित नथुराम गोडसे यांचा उल्लेख येणारच आहे. जगाच्या इतिहास अशा प्रकारचे उदाहरण असणे दुर्मिळच असणार, यात शंका नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे घटनेने प्रत्येकाला दिलेले आहे. जे गांधी यांच्या विचारांचा खर्या अर्थाने पुरस्कार करतात, ते कधीही पंडित नथुराम गोडसे यांचा द्वेष करणार नाहीत. पंडित नथुराम गोडसे यांनीही कधी गांधी यांचा द्वेष केला नाही, असे त्यांच्या जबानीत म्हटले होते. गांधी यांच्यावर आधी झालेल्या आक्रमणातील आरोपींना गांधी यांनी क्षमा केली होती, हे येथे लक्षात घ्यायला हवे. एकूणच गांधी आणि गोडसे असा वैचारिक वाद चालूच रहाणार, हे नक्की !