कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे धाडस कर्नाटकात भाजपच्या राज्यात होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारचा धर्मांध आणि समाजकंटक यांच्यावर वचक असला पाहिजे !
सावंतवाडी – कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील सदाशिवनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यावर काळी शाई ओतून विटंबना करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ १८ डिसेंबरला सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यानंतर कर्नाटकमध्ये धर्माभिमान्यांनी रस्त्यावर उतरून निषेध करण्यास प्रारंभ केला. काही ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या. या विटंबनेचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्नाटकातील भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी उपस्थित पदाधिकार्यांनी येथील उभाबाजार परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून अभिवादन केले. या वेळी कर्नाटकातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा शिवसेनेकडून निषेध
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणे, हा निंदनीय प्रकार आहे. याचा शिवसेना निषेध करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्नाटक राज्यातील वाहने आली, तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. कर्नाटक सरकारने याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केली आहे.
या घटनेचा शिवप्रेमी विविध ठिकाणी निषेध करत आहेत.