बाबरी मशीद पाडणार्‍यांना धर्मनिरपेक्षतेने शिक्षा दिली का ? – खासदार असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रीय अध्यक्ष, एम्.आय्.एम्.

बाबरने ५०० वर्षांपूर्वी श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी बांधली, ४०० वर्षांपूर्वी औरंगजेबने श्री काशी विश्‍वनाथाचे मंदिर पाडून तेथे ज्ञानवापी मशीद बांधली, तसेच मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर पाडून तेथे ईदगाह मशीद बांधली, यांसाठी त्यांच्या वंशजांना कोण शिक्षा देणार ? हे ओवैसी सांगतील का ? – संपादक

एम्.आय्.एम्.च्या सार्वजनिक सभेत बोलताना खासदार असदुद्दीन ओवैसी

मुंबई, १२ डिसेंबर (वार्ता.) – ‘धर्मनिरपेक्षता’ शब्दाने मुसलमानांना अधिक धोका दिला आहे. मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर मुसलमानांच्या रक्ताची होळी खेळली गेली, मुसलमान युवकांवर ‘टाडा’ लावण्यात आला. ही कोणती धर्मनिरपेक्षता ? बाबरी मशीद पाडणार्‍यांना धर्मनिरपेक्षतेने शिक्षा दिली का ? असा प्रश्‍न बाबरी मशीद पाडल्याविषयी एम्.आय्.एम्. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला. ११ डिसेंबरला चांदिवली येथे एम्.आय्.एम्.च्या सार्वजनिक सभेत ते बोलत होते. या वेळी मंचावर पक्षाचे खासदार इम्तियाज जलील, माजी आमदार वारीस पठाण आदी नेते उपस्थित होते.

ओवैसी पुढे म्हणाले,

१. मी राजकीय धर्मनिरपेक्षता मानत नाही, तर केवळ राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षताच मानतो. (ओवैसी यांची ढोंगबाजी ! जर ते खरोखर राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता मानत असते, तर त्यांच्या पक्षाच्या नावामध्ये ‘मुस्लमिन’ असा शब्द नसता. धर्माच्या आधारे त्यांनी त्यांचा पक्ष चालवला नसता, तसेच धर्माच्या आधारे मते मागितली नसती ! – संपादक)

२. मुंबई उच्च न्यायालयाने मुसलमान आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे मान्य केले आहे. ‘महाराष्ट्रातील मुसलमानांना आरक्षण देता येईल’, असे न्यायालयाने नमूद केले आहे; मात्र सरकार हे विसरले. (राज्यघटनेतच ‘धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही’, असे स्पष्ट केलेले आहे, हे ओवैसी सोयीस्करपणे सांगत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)

३. मुसलमानांना आरक्षण मिळाले, तर ते पटकन प्रगती करतील. (आरक्षण दिल्याने नव्हे, तर बुरसटलेल्या मध्ययुगीन प्रथांतून बाहेर पडून आधुनिक जगासमवेत राहिल्यासच मुसलमान प्रगती करू शकतील, हे आवैसी मुसलमानांना का सांगत नाहीत ? आरक्षणाचे गाजर दाखवून ओवैसी यांना केवळ त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे ! – संपदाक)

४. आरक्षण हा महाराष्ट्रातील मुसलमानांचा अधिकार आहे. आरक्षणामुळेच मुसलमानांना प्रतिष्ठा प्राप्त होईल. (देशात गेली ७० वर्षे आरक्षण मिळूनही अद्याप एकही समाजघटक पूर्ण प्रगती करू शकलेला नाही’, असे सांगितले जाते, मग मुसलमान तरी आरक्षणातून कशी प्रगती करणार आहेत ?, हे औवेसी यांनी स्पष्ट करायला हवे होते. – संपादक)

राहुल गांधी मुंबईत आल्यावर जमावबंदीचा आदेश काढणार का ?

एम्.आय्.एम्.च्या सभेच्या वेळी जमावबंदीचा आदेश काढणारे राहुल गांधी यांच्या मुंबई दौर्‍याच्या वेळी जमावबंदीचा आदेश काढणार का ? असा प्रश्‍न खासदर असुदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला.

एम्.आय्.एम्.च्या मुंबईतील सभेत कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा, पोलिसांचा विरोध झुगारून घेतली सभा !

कोरोनाचे नियम केवळ सर्वसामान्य लोकांना आहेत का ? पोलीस आणि प्रशासन एम्.आय्.एम्.च्या लोकांवर कारवाई का करत नाहीत ? – संपादक

सभेत कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा

मुंबई येथे सभा घेण्याची अनुमती नसतांना एम्.आय्.एम्.ने पोलिसांचा विरोध झुगारून सार्वजनिक सभा आयोजि केली. या सभेमध्ये मंचावरील मान्यवर, तसेच सभेला उपस्थित कार्यकर्ते यांतील बहुतांश जणांनी तोंडाला मुखपट्टी (मास्क) लावली नव्हती. सभास्थळी सामाजिक अंतरही पाळण्यात आले नव्हते. त्यामुळे या सभेत कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा वाजल्याचे दिसून आले. मुसलमानांना शैक्षणिक आरक्षण द्यावे आणि वक्फ मंडळाच्या भूमीवरील हक्क कायम ठेवावे, या मागण्यांसाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.