काँग्रेसींचा राजकीय ‘अंत’ !

संपादकीय

मुसलमानांना चुचकारण्यात आणि हिंदूंचा द्वेष करण्यात संपूर्ण हयात घालवलेल्या काँग्रेसचा अंत आता दृष्टीपथात आहे. गेल्या ८ वर्षांत हे अधिक प्रकर्षाने देशाला अनुभवायला येत आहे. एकीकडे देशाला ‘खरे स्वातंत्र्य हे वर्ष २०१४ मध्ये म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘काँग्रेसमुक्त भारता’ची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर मिळाले असल्या’चे म्हटले जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेस तिच्याच पायावर धोंडा मारून घेत इतिहासजमा होण्याच्या प्रगतीपथावर झपाट्याने प्रयाण करत आहे. गेल्या काही दिवसांतील या कंपूतील नेत्यांनी याचे सुतोवाच केले आहे. स्वत:च्या पुस्तकातून हिंदुत्वाची तुलना इस्लामिक स्टेट आणि बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनांशी केल्याने काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद हे टीकेचे धनी बनले आहेत. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या षड्यंत्राचीच ‘री’ ओढण्याचा खुर्शीद यांचा हा कुटील डाव आहे.

अत्याचारांची पराकाष्ठा !

जर हिंदुत्व एवढे घातक आणि संकुचित असते, तर या देशातील भारतविरोधी मुसलमानच नव्हे, तर हिंदूंना कायम दुय्यम दर्जाची वागणूक देणारी काँग्रेस अन् तिच्या नेत्यांचा राजकीय नव्हे, तर प्रत्यक्ष खात्मा झाला असता, हे ते विसरलेले दिसतात. अशा प्रकारचा प्रत्यय जिहादी संकट असलेल्या अफगाणिस्तान, इराक आणि सीरिया येथील परिस्थिती पाहिल्यावर येतो. वर्ष २०१४-१५ मध्ये जेव्हा ‘इस्लामिक स्टेट’ने इराक आणि सीरिया या इस्लामी देशांमध्ये लोकांचे शिरकाण करायला आरंभ केला, तेव्हा त्यात अनेक राजकीय नेते, सरकारी अधिकारी, न्यायाधीश यांचाही समावेश होता. इस्लामिक स्टेटने गेल्या काही वर्षांमध्ये इराक आणि सीरियाच नव्हे, तर युरोपातील बेल्जियम, युनायटेड किंगडम, स्पेन, फ्रान्स, डेन्मार्क, जर्मनी, फिनलँड, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान; आफ्रिका खंडातील लिबिया, ट्यूनिशिया, इजिप्त, नायजेरिया; आशिया खंडातील लेबेनॉन, येमेन, कुवेत, कझाकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, फिलिपीन्स, इंडोनेशिया, मलेशिया; तसेच अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड अशा अनेक देशांमध्ये सहस्रावधी लोकांना ठार केले आहे, तर त्याच्यापासून आपला जीव मुठीत धरून दीड कोटीहून अधिक जणांनी अन्य देशांचा आश्रय घेतला आहे. अत्याचारांची पराकाष्ठा काय असू शकते ? हे सांगण्यासाठी २१ व्या शतकातील हे उदाहरण पुरेसे आहे. ‘बोको हराम’ या जिहादी आतंकवादी संघटनेचा आफ्रिकेतील नायजेरियामध्ये उगम झाला. गेल्या १२ वर्षांत सहस्रावधी लोकांना ठार करणार्‍या आणि २० लाख लोकांना बेघर करणार्‍या बोको हरामने आता आफ्रिकेतील चॅड, नायजर आणि कॅमेरून या देशांतही तिची मुळे पसरवली आहेत. हिरव्या आतंकवादाने माखलेले हे जग आहे. आज हिंदुत्वामुळे किती अहिंदू अन् प्रामुख्याने मुसलमानांना घरदार सोडून परागंदा व्हावे लागले ? किती मुसलमानांना त्यांचा जीव गमवावा लागला ? याची आकडेवारी खुर्शीदसाहेब कधी का देत नाहीत ? आज भारतात सहस्रावधी ‘छोटे पाकिस्तान’ अस्तित्वात आहेत. तेथील मुसलमानांना हिंदुत्वामुळे त्यांचा जीव मुठीत धरून रहावे लागते कि मुसलमानेतरांना तेथून पलायन करावे लागते ? आज शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदू औषधालाही शिल्लक राहिलेले नाहीत. जर हिंदुत्व घातक असते, तर तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमुळे बहुसंख्यांक मुसलमान भयाच्या वातावरणात राहिले असते. तसे न होता उलट भारतातील अल्पसंख्यांकांमुळे भारतीय हिंदूंची स्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे खुर्शीद यांनी केलेले वक्तव्य पूर्णत: निराधार आणि हिंदुत्वनिष्ठांच्या तळपायाची आग मस्तकात नेणारे आहे.

एका विचारसरणीच्या विरोधात पुस्तक लिहिल्यास त्याचा किती आणि कोणत्या स्तरावर जाऊन विरोध होऊ शकतो, याचे गेल्या ३ दशकांतील मोठे उदाहरण म्हणजे ब्रिटीश लेखक सलमान रश्दी यांनी वर्ष १९८८ मध्ये लिहिलेले इस्लामवर टीका करणारे ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ हे पुस्तक ! इराणचे तत्कालीन अध्यक्ष अयातोल्ला रुहोल्लाह खोमेनी यांनी स्वत: रश्दी यांना ठार करण्यासाठी जारी केलेला फतवा जिहाद्यांमधील धर्मांधतेचा अतिरेक स्पष्ट करतो. त्या काळात जिहाद्यांनी निर्माण केलेले वातावरण किती भयावह होते, हे सांगण्यासाठी रश्दी यांना त्यांची लेखणी खर्च करून ‘जोसेफ अँटन : अ मेमॉयर’ नावाचे वेगळे पुस्तक प्रकाशित करावे लागले. ६ डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी ढाचा पाडण्यात आल्यानंतर त्याचे पडसाद इस्लामी बांगलादेशात उमटले. तेव्हा तेथील हिंदु महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचारांवर प्रकाश टाकणारे ‘लज्जा’ ही कादंबरी लिहिल्यानंतर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना ठार मारण्याच्या अनेक धमक्या मिळाल्या. स्वरक्षणासाठी नसरीन यांनी आधी भारतात आणि आता स्वीडनमध्ये आश्रय घेतला. हिंदुत्व घातक असते, तर खुर्शीद यांची स्थिती काय झाली असती, हे सांगण्यासाठीच या उदाहरणांचा उल्लेख देणे आवश्यक वाटले !

हिंदुत्वाचा जागर !

अर्थात् हिंदूंनी आता शांत न रहाता हिंदुद्वेष्ट्यांच्या विरोधात ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. कपिल मिश्रा यांनी ‘हिंदुत्व म्हणजे काय ?’ याचे सुरेख वर्णन केले आहे. ‘सहस्रावधी वर्षांपासून हिंदुत्व हा आतंकवाद्यांसाठी ‘आतंक’ राहिलेला आहे, शिशुपालाचे शंभर अपराध भरेपर्यंत भगवान श्रीकष्ण शांत राहिले; परंतु १०१ व्या अपराधाला त्यांनी त्याचा वध केला. यालाच ‘हिंदुत्व’ म्हणतात’, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे आता काँग्रेसरूपी शिशुपालाचा राजकीय अंत करण्यासाठी हिंदूंनी कंबर कसणे आवश्यक आहे. हिंदुत्व केवळ शबरीची उष्टी बोरे अथवा राधेची भक्ती एवढ्यावर सीमित नाही, हे हिंदुद्वेष्ट्यांना दाखवून द्यायची वेळ आली आहे ! त्यासाठीच आता ‘हिंदुत्वाचा जागर होणे’ ही काळाची आवश्यकता आहे. काळाची पावले ओळखून खुर्शीदसारख्यांचा भरणा असणार्‍या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपवण्यासाठी हिंदूंनो आतातरी सिद्ध व्हा !