बंगालमध्ये दुर्गापूजा मंडपांवर आक्रमण करून दहशत माजवणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

राष्ट्रीय बजरंग दल (गोवा)ची राज्यपालांकडे मागणी

पणजी, १२ नोव्हेंबर (वार्ता.)  बंगालमध्ये दुर्गापूजा मंडपांवर आक्रमण करून देशभरात दहशत माजवणार्‍यांची कृती निषेधार्ह आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय बजरंद दल (गोवा)ने गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रीय बजरंग दल (गोवा)चे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी ही माहिती दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘बंगालमध्ये रोहिंग्या आणि धर्मांध लोक तेथील हिंदूंना डोईजड झाले आहेत. बांगलादेश येथे दुर्गापूजा मंडपावर आक्रमण करून ‘इस्कॉन’ संप्रदायाच्या अनुयायाची हत्या करण्यात आली. असा अन्याय हिंदूंवरच का केला जात आहे ? देशातील सहिष्णुतावादी यावर मूग गिळून गप्प का ? बंगालची तृणमूल काँग्रेस निवडणुकीच्या निमित्ताने गोव्यात आली आहे. ‘प्रचारासाठी गोव्यात सहस्रो लोक आणणार’, असे तृणमूल काँग्रेसचे म्हणणे आहे. गोव्यात सध्या ८० सहस्र रोहिंग्या वास्तव्य करून आहेत. बंगालमधून रोहिंग्या पुन्हा गोव्यात आल्यास ते येथून परत जाणार नाहीत. हे लोक गोमंतकियांना पुढे डोईजड ठरणार आहेत. याची शासनाने नोंद घेऊन आवश्यक दक्षता घ्यावी. आतंकवाद्यांशी संबंध असलेली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही संघटना गोव्यात सक्रीय आहे. या संघटनेवर बंदी घालावी.’’