१. रामनाथी आश्रमात कालसर्प विधी चालू असतांना आध्यात्मिक त्रास होणे
‘२६.२.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात कालसर्प विधी करण्यात आला. त्या वेळी नामजपाला बसल्यावर मला पुष्कळ दाब जाणवत होता. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचा ‘तोंडवळा बघू नये’, असे मला वाटत होते. विधी चालू झाल्यावर थोड्या वेळाने मला आध्यात्मिक त्रास होऊ लागला; म्हणून मी बाहेर स्वागतकक्षाच्या येथे जाऊन उभे राहिले. मला ‘तिथेही बसू नये’, असे वाटत होते. थोड्या वेळाने पुन्हा विधीजवळ नामजपाला बसले आणि ॐ चा जप केल्यावर मला चांगले वाटू लागले.
२. विधी संपल्यावर दर्शन घेऊन पुढे जात असतांना समोर एक अती भयंकर आकृती दिसणे
विधी चालू असतांना अचानक माझ्या उजव्या डोळ्यांत रक्त साकळल्याचे जाणवले. विधी संपल्यावर दर्शन घेऊन पुढे जाणार तेवढ्यात मला समोर एक अती भयंकर आकृती दिसली. ती मला पुढे जाऊ देत नव्हती. त्या दिवसापासून आतापर्यंत माझ्या डोळ्यांना तीव्र वेदना होत होत्या.
३. नामजपाच्या वेळी पोशाखावर मोठे रक्ताचे जाड डाग पडणे आणि त्यावर मात करण्यासाठी संतांनी नामजप सांगणे
२.३.२०१९ या दिवशी दुपारी १ वाजता मी ध्यानमंदिरात नामजप करायला गेले. त्या वेळी माझ्या पोशाखावरील गळा आणि ओढणी यांवर अकस्मात् तीन-चार रक्ताचे मोठे जाड डाग पडले; म्हणून मी पोशाखाचे छायाचित्र काढून ते सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना दाखवले. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘पोशाखावर ठसे उमटले आहेत.’’ त्यांनी मला ‘महाशून्य’चा नामजप करायला सांगितला. दुसर्या दिवशी सकाळी मी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना डोळ्यांच्या त्रासासाठी नामजप विचारला. त्यांनी मला ‘एकम्’चा जप करायला सांगितला.
४. कृतज्ञता
वाईट शक्ती कितीही प्रकारे त्रास देत असली, तरी परात्पर गुरु डॉ. आठवले, आश्रमातील अन्य संत, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चैतन्याने या सर्व त्रासांवर लढण्यासाठी शक्ती मिळत आहे. त्यासाठी सर्वांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– सौ. वैशाली मुद्गल, रामनाथी आश्रम, फोंडा, गोवा. (२.३.२०१९)