आतंकवादाला पोसणार्‍यांवरच आतंकवाद उलटेल !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतून पाकला चेतावणी

न्यूयॉर्क (अमेरिका) – आतंकवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करणार्‍यांनी एक लक्षात घ्यावे की, आतंकवाद हा त्यांच्यासाठीही मोठा धोका आहे. तो त्यांच्यावरच उलटेल, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे नाव न घेता त्याला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सुनावले. संयुक्त राष्ट्रांच्या ७६ व्या महासभेत ते बोलत होते. ‘कोणत्याही भूमीचा वापर आतंकवाद पोसण्यासाठी आणि आतंकवादी आक्रमणासाठी होता कामा नये’, असेही मोदी यांनी सांगितले.

मोदी यांनी मांडलेली सूत्रे

अफगाणिस्तानमधील महिला आणि अल्पसंख्यांक समुदाय यांना साहाय्याची आवश्यकता असून आपल्याला ती करावीच लागणार आहे. जागतिक कायदे, नियम आणि मूल्ये यांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांना आणखी बळकट करण्याची आवश्यकता आहे. जगभरातील लस उत्पादकांनी लस निर्माण करण्यासाठी भारतात यावे. आज जगातील सहावी व्यक्ती भारतीय असून भारताची प्रगती होत आहे.