उपमुख्यमंत्री आजगांवकर आणि सार्वजनिक बांधकाममंत्री पाऊसकर यांना उच्च न्यायालयाकडून नोटीस

आमदार बाबू आजगांवकर आणि दीपक पाऊसकर

मगो पक्षाने प्रविष्ट केलेली अपात्रता याचिका !

पणजी , २४ सप्टेंबर –  मगो पक्षाने उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या अपात्रता याचिकेच्या प्रकरणी उच्च न्यायालयाने आज मगो पक्षाचे माजी आमदार आणि भाजपचे विद्यमान आमदार बाबू आजगांवकर आणि दीपक पाऊसकर यांना नोटीस पाठवली. या प्रकरणी पुढील सुनावणी २२ ऑक्टोबरला निश्चित करण्यात आली आहे. मगोच्या या २ माजी आमदारांच्या अपात्रतेविषयीची मगो पक्षाची याचिका गोवा विधानसभेच्या सभापतींनी यापूर्वी फेटाळून लावली होती. सभापतींच्या या आदेशाच्या विरोधात मगोचे नेते तथा आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर २४ सप्टेंबरला सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने दोन्ही आमदारांना नोटीस पाठवली आहे. वर्ष २०१७ मधील निवडणुकीत मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर या दोन्ही आमदारांनी नंतर मगो पक्षाला सोडचिठ्ठी देऊन रातोरात भाजपमध्ये प्रवेश केला होता.