सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळालेली मान्यता रहित

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी केंद्रशासनाच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (‘नॅशनल मेडिकल कमिशन’ने) दिलेली मान्यता प्रशासकीय त्रुटी काढून अचानक रहित केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने अतिशय महत्त्व असलेल्या या महाविद्यालयाची मान्यता रहित झाल्याने सर्वसामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे, तर जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या या महाविद्यालयाची मान्यता ज्या कारणांमुळे रहित झाली, ती लवकरात लवकर दूर करण्यासाठी प्रयत्न केले जावेत’, अशी मागणी जनतेतून होत आहे.

महाविद्यालयाला दिलेली मान्यता रहित होणे संशयास्पद ! – परशुराम उपरकर, मनसे

कणकवली – या महाविद्यालयाला मिळालेली मान्यता रहित करण्याचा आदेश काढला आहे. याच आयोगाने महाविद्यालयाची पहाणी करून संमती दिली अन् आता हाच आयोग त्रुटी काढून मान्यता त्वरित रहित करतो, हे संशयास्पद आहे, असा आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार उपरकर बोलत होते. या वेळी उपरकर म्हणाले, ‘‘केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कुडाळ तालुक्यातील पडवे येथे वैद्यकीय महाविद्यालय आहे. २ दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री शहा आणि राणे यांची देहली येथे भेट होते अन् शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रहित करण्याचा आदेश निघतो, हेच संशयास्पद आहे. जिल्ह्यात ‘स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय आहे; म्हणून दुसरे वैद्यकीय महाविद्यालय येऊ नये’, असा विचार कोण करत असतील, तर तो चुकीचा आहे.’’

शासकीय महाविद्यालयाचे श्रेय मिळण्यासाठी चुका करू नयेत ! – नितेश राणे, आमदार भाजप

कणकवली – जिल्ह्यात होणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कुणा एकाची मक्तेदारी नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी हे महाविद्यालय महत्त्वपूर्ण आहे. या क्षेत्राचा अनुभव असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मार्गदर्शन घ्या. महाविद्यालयाला अनुमती मिळवणे येड्यागबाळ्याचे काम नव्हे. जिल्ह्याच्या हितासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाविद्यालयाची मान्यता रहित झाल्याच्या पार्श्वभूमीवर सांगितले.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काढलेल्या त्रुटी त्वरित दूर करा ! – श्याम सावंत, अध्यक्ष, ‘सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती’

सावंतवाडी – महाविद्यालयाची मान्यता रहित झाली असली, तरी महाविद्यालयात याच शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आमचा रेटा यापुढेही चालू राहील. महाविद्यालयाच्या अनुषंगाने काढलेल्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर पुढाकार घ्यावा, त्यासाठी येत्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असे ‘सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती’चे अध्यक्ष श्याम सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काढलेल्या त्रुटी दूर करू ! – विनायक राऊत, खासदार, शिवसेना

सावंतवाडी – एकदा मान्यता मिळाल्यानंतर ती रहित होणे धक्कादायक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि आम्ही हारही मानणार नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गवासियांच्या भल्यासाठी आहे. यामुळे केंद्रस्तरावरील समितीने लक्षात आणून दिलेल्या त्रुटींची लवकरच पूर्तता करू. यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेला कोणतीही अडचण येणार नाही, असे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.