खाण महामंडळ विधेयक संमतीसाठी राज्यपालांकडे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

पणजी, ३ सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यात खनिज खाण विकास महामंडळ स्थापन करण्याविषयीचे विधानसभेने संमत केलेले विधेयक गुरुवार, २ सप्टेंबर २०२१ या दिवशी सरकारने संमतीसाठी राज्यपालांकडे पाठवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘खाण महामंडळ स्थापन होऊ लागले आहे. राज्यपालांकडून विधेयक संमत होऊन आल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. येत्या ३ दिवसांत विधेयक येईल. भूमीपुत्र विधेयक मात्र आम्ही राज्यपालांकडे पाठवलेले नाही. ते विधेयक अजून कायदा खात्याकडे आहे.’’

२ सप्टेंबर २०२१ या दिवशी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हुब्बळ्ळीला आले होते. त्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. गोव्यातील खाणींचा विषय, राजकीय स्थिती आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची सिद्धता यांवर ही चर्चा झाली.