१०० कोटी रुपयांचे स्मारक उभारण्यास प्रारंभ !
पुणे, ३ सप्टेंबर – मध्यप्रदेश सरकारच्या माहिती सांस्कृतिक विभागाने परमप्रतापी बाजीराव पेशवे यांच्यावर एक विशेष चित्रफित सिद्ध करून अत्यंत आदरपूर्वक बाजीराव यांचे स्मरण करत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. एकूण ३ मिनिटांच्या या चित्रफितीमध्ये बाजीराव यांच्या २० वर्षांच्या लढाऊ कारकिर्दीचा धावता आढावा घेण्यात आला आहे. मध्यप्रदेश सरकारने बाजीराव यांनी चिरविश्रांती घेतली त्या मध्यप्रदेशातील रावेरखेडी या नर्मदातिरी असणार्या गावात त्यांचे १०० कोटी रुपयांचे स्मारक उभारण्यास प्रारंभ केला असून त्यातील २७ कोटी रुपयांच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
जयपूरच्या गुलाबी दगडांमध्ये बांधल्या जात असलेल्या या स्मारकाच्या रचनेत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी स्मारक मराठा स्थापत्यशैलीत, सह्याद्रीच्या काळ्या पाषाणात आणि शनिवारवाड्याच्या देहली दरवाजासहित असावे, अशी दुरूस्ती सुचवली आहे. मध्यप्रदेश सरकारने ही दुरुस्ती तत्परतेने मान्य केली.