सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि या चार युगांमध्ये मनुष्याच्या प्राणाचे शरिरातील स्थान पालटून आयुष्य न्यून होणे अन् ईश्वरप्राप्तीचे साधनामार्ग वेगवेगळे असणे

अहो कृतयुगामाजी पाहता । अस्थिगत प्राण होता ।
जेव्हा अस्थी पडती सर्वथा । तेव्हा प्राण जातसे ।।

म्हणोनि तोपर्यंत साधन । करित बैसती अरण्यी जाऊन ।
त्रेतायुगी ते चर्मगत प्राण । चर्म झडता मृत्यु होय ।।

द्वापरी प्राण नाडीगत । नाडी सुकती तो वाचत ।
ऐसे पूर्वी आयुष्य बहुत । होते सकळ मानवा ।।

आणि लक्ष अयुत सहस्र वर्षे । ऐसी तेव्हा होती आयुष्ये ।
म्हणोनि सकळ बहुत वर्षे । अनुष्ठाने आचरत ।।

आणि ऐसे तप करित । की जेणे अंगी वारुळ वाढत ।
मग प्रसन्न होऊनि भगवंत । आपुल्या नेत पदासी ।।

आता तो अन्नमय प्राण । अन्नाविण सत्वर मरण ।
आणि आयुष्य तेहि अपूर्ण । नोहे साधन काहीच ।।

– शिवलीलामृत, अध्याय १५, ओवी १८६ ते १९१

अर्थ : सत्ययुगामध्ये प्राण अस्थींमध्ये होता. जेव्हा अस्थी नष्ट होत, तेव्हा प्राण जात असे. त्यामुळे मनुष्य अरण्यामध्ये जाऊन अनेक वर्षे तप करू शकत होता. त्रेतायुगामध्ये चर्मामध्ये प्राण आला, कातडी झडता मृत्यू होई. द्वापरयुगात शरिरातील नाड्यांमध्ये (धमन्यांमध्ये) प्राण होता. नाड्यांचे कार्य चालू असेपर्यंत मनुष्य जिवंत रहात असे. अशा प्रकारे पूर्वी युगांनुसार अनुक्रमे लक्ष, दहा सहस्र आणि एक सहस्र अशी सर्व मनुष्यांची आयुर्मर्यादा होती. त्यामुळे सर्व जण बरीच वर्षे अनुष्ठाने करत असत. अंगावर वारुळ सिद्ध (तयार) होईपर्यंत तप करत असत. त्यामुळे भगवंत प्रसन्न होऊन त्यांना आपल्या लोकी स्थान देत असे. आता कलियुगात मात्र प्राण ‘अन्नमय’ आहे. अन्न मिळाले नाही, तर लगेचच मरण येते. त्यामुळे आयुष्यही अपूर्ण आहे आणि साधना काहीच नाही.