सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेले भाववृद्धीचे प्रयोग केल्यामुळे साधिकेमध्ये झालेले परिवर्तन

सद्गुरु श्री. राजेंद्र शिंदे

‘८.१.२०२० या दिवशी मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेला भाववृद्धीच्या प्रयोगांविषयीचा सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा लेख वाचला आणि मी तसे छोटे-छोटे भाववृद्धीचे प्रयोग करण्याचे ठरवले. या प्रयोगांतून मला मिळालेला आनंद मी पुढे कृृतज्ञताभावात मांडत आहे.

१. गोव्याला रहायला आल्यावर यजमानांच्या नोकरीत स्थिरता नसल्याने काळजी वाटून मनःस्वास्थ्य बिघडणे

आम्ही पुणे सोडून गोव्याला रहायला आलो. आरंभी यजमानांना काम मिळाल्यामुळे आमचे भागत होते. त्यानंतर ३ मासांनी त्यांना ‘अचानक कामावर येऊ नका’, असे सांगण्यात आले. तेव्हा माझ्या मनात काळजीचे विचार चालू झाले. त्यानंतर १५ दिवसांनी त्यांना दुसरीकडे १ मासासाठी काम मिळाले. एक मासानंतर पुन्हा माझ्या मनात काळजीचे विचार चालू झाले. त्यानंतर यजमान दीड मास घरीच होते. त्यांच्या वयोमानानुसार आणि अल्प शिक्षणामुळे त्यांना कुठेही नोकरी मिळेना. कामासाठी दूरवर जावे लागायचे. त्यामुळे जाण्या-येण्याचा व्ययही पुष्कळ होता. या सर्वांमुळे माझी मन:स्थिती फारच बिघडली होती. मीसुद्धा सकाळी एक वेळ काम करून दुपारी रामनाथी आश्रमात जायचे ठरवले होते. मला एके ठिकाणी काम मिळाले; परंतु त्यांनी ३ मासांनी ‘येऊ नका’, असे मला सांगितले.

२. आश्रमात गेल्यावर विचार उणावणे; परंतु आश्रमाच्या बाहेर पडल्यावर विचार वाढून विविध शारीरिक व्याधीही जडणे

मी दुपारनंतर आश्रमात जात होते. आश्रमात गेल्यावर माझ्या मनात घरचे विचार मुळीच येत नव्हते. आश्रमाच्या बाहेर पडल्यावर मात्र पुन्हा विचार चालू व्हायचे, ‘उद्या काय करायचे ? कसे भागवायचे ?’ त्यात ६ मास गेले. माझी प्रकृतीही बरी नसायची. माझ्या अंगातील रक्त अल्प झाल्यामुळे मला फार थकवा असायचा. मागील पावणे दोन वर्षांपासून मला उष्णतेने तोंडाचा विकार होऊन जेवण जात नसे. माझ्या मनात सतत घरचे विचार यायचे, ‘आपल्याकडे पैसे नाहीत, तर आपले भागणार कसे ?’

३. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेले भाववृद्धीसाठीचे प्रयोग वाचून तसे प्रयत्न करण्यास प्रारंभ करणे

याच कालावधीत मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेले भाववृद्धीसाठीचे प्रयोग असलेला लेख वाचला आणि ‘आपणही असे छोटे-छोटे भावप्रयोग करूया’, असे मी ठरवले. मी दैनिक वाचत असतांनाच ‘मला दैनिकातून पिवळ्या रंगाचे चैतन्य मिळत आहे. ते माझ्या अंतर्मनात जात आहे. माझ्या मनाची शुद्धी होत आहे आणि देहावरील त्रासदायक आवरण नष्ट होत आहे’, असा मी भाव ठेवला.

४. भावजागृतीसाठी केलेले छोटे प्रयोग

अ. मी अंथरुणावर श्रीकृष्णाच्या शेल्याची चादर घातलेली आहे आणि त्यातून मला चैतन्य मिळत आहे.

आ. मला दात घासतांना दंतमंजनातून चैतन्य मिळत आहे.

इ. मला तोंड धुतांना पाण्यातून जलदेवतेकडून येणारे चैतन्य मिळत आहे.

ई. मला स्वयंपाक करतांना आणि जेवतांना अन्नपूर्णा मातेकडून चैतन्य मिळत आहे.

उ. श्रीकृष्णाचे चित्र आणि गुरुदेवांचा ‘छायाचित्रमय जीवनदर्शन खंड ३’ हा ग्रंथ यांतून मला चैतन्य मिळत आहे.

ऊ. मी गुरुदेवांना वाहिलेल्या जास्वंदाच्या फुलांमधून मला चैतन्य मिळत आहे.

५. सहा मास विचार करून कोमेजलेले मन भाववृद्धीचे प्रयत्न केल्यावर फुलणे आणि कृतज्ञतेने भावाश्रू येणे

त्यानंतर ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ (खंड १) या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील गुरुदेवांचे हसरे छायाचित्र पाहून माझे मनसुद्धा सारखे हसू लागले. देव माझ्याकडून असे छोटे-छोटे भावप्रयोग करवून घेत होता. हे करता करता अचानक माझा भाव जागृत झाला आणि कृतज्ञतेने भावाश्रू यायला लागले. मी मनोमन सद्गुरु राजेंद्रदादा आणि परात्पर गुरुदेव यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त केली. गेले ६ मास माझे मन विचार करून करून कोमेजले होते. त्याला सद्गुरु राजेंद्रदादांच्या भाववृद्धीच्या लेखाने खतपाणी मिळाले आणि आता ते जास्वंदाच्या फुलासारखे फुललेले आहे. (ही ओळ लिहितांना मला सतत भावाश्रू येत होते.)

‘देवा, या मायेमध्ये भरकटलेल्या मनाला तू पुन्हा टवटवीत केलेस. तूच या जिवाकडून छोटे-छोटे भावप्रयोग करवून घेत आहेस’, त्यासाठी मी तुझ्याप्रती अखंड कृतज्ञ आहे.’

– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१.२०२०)