केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे आणि नंतर त्यांना झालेल्या अटकेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद

  • जिल्ह्यात तणावाचे वातावरण

  • शिवसैनिकांकडून राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्ग – केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्र राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उमटले. जिल्ह्यात कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले आणि सावंतवाडी येथे शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुतळा हिसकावून घेतला. या वादामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि मालवण येथे शिवसेनेच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.

दोडामार्ग येथे शिवसैनिकांनी राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली. या वेळी शिवसैनिकांनी राणे यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेत शिवसैनिकांना खडसावले. या वेळी झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान हातघाईवर येण्यात झाले; मात्र पोलीस वेळीच घटनास्थळी आल्याने पुढील अनर्थ टळला.

केंद्रीय मंत्री राणे यांना अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील शेकडो कार्यकर्त्यांनी चिपळूणच्या दिशेने धाव घेतली.

नारायण राणे यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास भाजपची जनआशीर्वाद यात्रा रोखण्याची शिवसैनिकांनी दिली होती चेतावणी

नारायण राणे यांच्यावर कारवाई न झाल्यास भाजपची जनआशीर्वाद यात्रा शिवसैनिक रोखतील, अशी चेतावणी शिवसेनेचे कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी कणकवली पोलिसांना निवेदनाद्वारे दिली होती.

डिगस आणि आवळेगाव येथे रस्त्यावर झाड टाकून पणदूर-घोडगे मार्ग बंद करण्याचा प्रयत्न

शिवसेना आणि भाजप विशेषत: नारायण राणे यांच्यात चालू असलेल्या वादाचे परीणाम जिल्ह्यात दिसून येत असून कुडाळ तालुक्यातील पणदूर-घोटगे मार्गावर डिगस आणि आवळेगाव येथे झाड आडवे टाकून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला. यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. हा प्रकार शिवसैनिकांनी केला कि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे मात्र समजू शकले नाही.

नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा ! – खासदार विनायक राऊत, शिवसेना

कणकवली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य करून अवघ्या महाराष्ट्राचा अवमान करणार्‍या नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. राणे यांच्या ‘जनआशीर्वाद यात्रे’चा आता शिवसैनिक निषेध करतील आणि येणार्‍या निवडणुकांमध्ये राणे यांना नक्कीच पाणी पाजतील, अशी चेतावणी राऊत यांनी दिली.

संभाजीनगर, अमरावती, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली आणि कोल्हापूर येथेही या प्रकरणाचे पडसाद उमटले.

नारायण राणे यांच्या अटकेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपकडून निषेध

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेनंतर सावंतवाडीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथील कार्यालयासमोर रस्ताबंद आंदोलन करून निषेध केला. ‘हे प्रकार असेच चालू राहिले, तर पुढे आंदोलन अधिक तीव्र करू’, अशी चेतावणी त्यांनी दिली. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या वेळी भाजपचे नगराध्यक्ष संजू परब, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले, नगरसेवक यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. बांदा येथेही भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग बंद करून राणे यांना झालेल्या अटकेचा निषेध केला. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.