मालवण येथे शिवकालीन परंपरेप्रमाणे मानाचे श्रीफळ समुद्रास अर्पण
मालवण – शिवकालीन परंपरा लाभलेला मालवणाचा ऐतिहासिक नारळी पौर्णिमेचा उत्सव येथे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी सिंधुदुर्ग किल्ल्यातील रहिवाशांच्या वतीने समुद्रास मानाचे श्रीफळ अर्पण करण्यात आल्यानंतर व्यापारी बांधव, मासेमार आणि नागरिक यांनीही समुद्रास श्रीफळ अर्पण केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्यत्रही नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन उत्सव साजरे करण्यात आले.
कोरोना महामारीच्या संकटामुळे नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आले आहेत. यावर्षीही शिवकालीन परंपरा लाभलेल्या नारळी पौर्णिमेचा उत्सव कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला. दुपारी सर्व व्यापारी बांधव बाजारपेठेतील हनुमान मंदिरात एकत्र जमले. त्यानंतर वाजतगाजत मिरवणुकीने सर्व व्यापारी बांधव आणि नागरिक बंदर जेटी येथे गेले. किनार्यावर व्यापारी बांधव आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने विधीवत् पूजा करण्यात आली. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील रहिवाशांच्या वतीने श्रीफळाची पूजा करण्यात आली. दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी किल्ल्यावरील रहिवाशांनी मानाचे श्रीफळ अर्पण केले.
या वेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन वाळके, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, अशोक सावंत, सुदेश आचरेकर, पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्यासह अन्य व्यापारी बांधव आणि नागरिक उपस्थित होते. या वेळी बंदर जेटी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सावंतवाडी येथे प्रथेप्रमाणे सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत-भोसले आणि पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी मानाच्या श्रीफळाचे पूजन केले. त्यानंतर येथील मोती तलावात श्रीफळ अर्पण करण्यात आले.
वेंगुर्ले येथे वेंगुर्ले बंदरावर नागरिकांसह पोलीस, तालुका पत्रकार समिती, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यात आले. पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसेचे जिल्हा सदस्य नितीन कुबल यांनी श्रीफळाचे विधीवत् पूजन केले. त्यांनतर सर्वांनी समुद्राला श्रीफळ अर्पण केले.