पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर ‘ए.सी.बी.’ची धाड !

स्थायी समिती अध्यक्षांसह चौघांना घेतले कह्यात

पुणे, २० ऑगस्ट – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आर्थिक निर्णय घेणार्‍या स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर १८ ऑगस्ट या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ए.सी.बी.) पथकाने धाड टाकली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह चौघांना कह्यात घेण्यात आले आहे. स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय साहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांचीही ए.सी.बी.च्या अधिकार्‍यांकडून चौकशी चालू आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. या संदर्भातील तक्रार नेमकी कोणी केली ?, याविषयी अद्याप काही समजू शकलेले नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा १८ ऑगस्ट या दिवशी पार पडली. नंतर सायंकाळी ५ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. या वेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.