अमरावती येथील महापालिकेच्या आमसभेत युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ !

स्वतःच्या मागण्यांसाठी आमसभेत घुसून गोंधळ घालणे हे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अशोभनीय ! – संपादक

अमरावती – १७ ऑगस्ट या दिवशी येथील महापालिकेच्या मासिक आमसभेत युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बळजोरीने घुसून गोंधळ घातला. यामुळे आमसभा स्थगित करण्यात आली. सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध नोंदवला आहे.

युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने म्हणाले की, महापालिकेत कुशल आणि अकुशल कामगार पुरवण्याचे कंत्राट ‘ईटकॉन’ आस्थापनाला देण्यात आले आहे. या आस्थापनाकडून महापालिकेत काम टिकून रहावे, यासाठी कामगारांकडून २५ सहस्र रुपये लाच मागण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. आमदार रवी राणा यांच्या निर्देशानुसार आम्ही या आस्थापनाच्या कार्यप्रणालीविषयी आयुक्तांना अवगत करण्यासाठी आलो होतो. (आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना गोंधळ न घालता वैध मार्गाने आयुक्तांशी चर्चा करायला सांगणे अपेक्षित होते. – संपादक) या आस्थापनाला कंत्राट देतांना नगरसेवकांना आर्थिक लाभ झाला आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी सभागृहात जाऊन निषेध नोंदवला आहे.

महापौर चेतन गावंडे यांच्याकडून पोलीस आयुक्तांकडे तक्रार प्रविष्ट !

महापालिकेच्या आमसभेत घुसून गदारोळ घालणे, हे लोकशाहीला पोषक नसल्याने महापौर चेतन गावंडे यांनी या प्रकरणाची तक्रार पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्याकडे केली आहे. या वेळी त्यांच्यासमवेत उपमहापौर कुसूम साहू, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक विलास इंगोले, मिलिंद चिमोटे आदी उपस्थित होते. ‘सभागृहात जो प्रकार घडला, त्याविषयीची तक्रार आम्ही पोलीस आयुक्तांकडे केली आहे. पोलीस आयुक्तांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे’, असे महापौर गावंडे यांनी सांगितले.