अवैध भारतीय पारपत्रे सिद्ध करणार्‍या बांगलादेशी टोळीला अटक

  • गुन्हे शाखेची कारवाई !

  • ५ जन्मदाखले, ४ आधारकार्ड, ४ पॅनकार्ड आणि ४ सीमकार्ड यांसह बांगलादेश बँकेचे २ एटीएम् हस्तगत

बांगलादेशी घुसखोरांचे नंदनवन झालेला भारत ! भारतात अवैधरित्या प्रवेश करणार्‍या बांगलादेशी घुसखोरांवर कठोरात कठोर कारवाई केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत. – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे – बांगलादेशी नागरिकांना भारतीय पारपत्र सिद्ध करून देणार्‍या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक केलेला आरोपी राजू उपाख्य फारूख सफी मोल्ला (वय २९ वर्षे) हा मूळचा बांगलादेशचा रहिवासी असून त्याला न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून माहिती मिळाल्यावर कळवा पोलिसांनी सुरत येथे जाऊन ११ बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेतले. त्यातील ३ आरोपींना कळवा पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आठ आरोपींना सुरत पोलिसांच्या कह्यात दिले आहे. त्यांच्याकडून भारतीय बनावटीची १२ पारपत्रे, पश्चिम बंगाल येथे सिद्ध केलेले ५ जन्मदाखले, ४ आधारकार्ड, ४ पॅनकार्ड आणि ४ सीमकार्ड यांसह बांगलादेश बँकेचे २ एटीएम् असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बांगलादेशी महिलाही भारतीय पारपत्र सिद्ध करून परदेशात वेश्याव्यवसाय करण्यास जात असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे.

अटक केलेले श्रीती राजू मोल्ला उपाख्य सुमी, मोहमद इमोन मोईन खान, मोहमद सैपुल अल्लाउद्दीन मोल्ला हे सर्वजण बांगलादेश येथे वास्तव्य करत होते.