छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर काय झाले असते ? – पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ९९ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !

नवी देहली – छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष आहेत. तसेच भारताचा वर्तमानकाळ आणि भूगोलसुद्धा त्यांच्या अमरगाथेने प्रभावित झालेला आहे. आपल्या या भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार केल्यावर एक पुष्कळ मोठा प्रश्न आहे की, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झाले असते ? छत्रपती शिवाजी महाराजांविना भारताच्या सध्याच्या स्वरूपाची आणि भारताच्या गौरवाची कल्पनाही करता येणार नाही. त्यामुळेच बाबासाहेब पुरंदरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एवढी भक्ती आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ९९ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना काढले. पुण्यामधील शिवसृष्टीमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून विशेष संदेश दिला.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, बाबासाहेब त्यांच्या वयाच्या १०० व्या वर्षांत प्रवेश करत असतांनाच आपला देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करत आहे. बाबासाहेबांनाही हा योगायोग म्हणजे त्यांना भारतमातेने दिलेला आशीर्वादच वाटत असणार यात शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आदर्श बाबासाहेबांनी देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला तो आम्हाला कायमच प्रेरणा देत रहाणार आहे. तरुण इतिहासकारांनी बाबासाहेबांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. मला आठवत आहे की, ४ दशकांपूर्वी कर्णावतीमध्ये जेव्हा बाबासाहेबांचे कार्यक्रम व्हायचे, तेव्हा मी नेहमीच त्यांना उपस्थित रहायचो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि इतिहास लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी जे योगदान दिले आहे, त्यासाठी आपण सर्वच त्यांचे ऋणी राहू. या ९९ व्या वाढदिवसानिमित्त देशाला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली हे भाग्यच आहे. मी श्री भवानीमातेच्या चरणी प्रार्थना करतो की, त्यांना उदंड आयुष्य लाभावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून दिल्या शुभेच्छा !

संदेशाचा प्रारंभ करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठीतून म्हणाले की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मी प्रारंभी साष्टांग नमस्कार करतो. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श उभे केले आहेत, जी शिकवण दिली आहे, तिचे आचरण करण्याची शक्ती परमेश्वराने मला द्यावी’, अशी प्रार्थना मी देवाकडे करतो.

तिथीनुसार वाढदिवस साजरा करणारे बाबासाहेब पुरंदरे !

पुणे – आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर संशोधन करून शिवचरित्र घराघरांत पोचवणार्‍या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १३ ऑगस्ट या दिवशी शंभरीत पदार्पण केले. आज त्यांचा तिथीनुसार वाढदिवस साजरा करण्यात आला. (हिंदु धर्मानुसार तिथीनुसार वाढदिवस साजरा केल्याने त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. – संपादक) लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला.

आयुष्यभर शिवचरित्राची महापूजा मांडणार्‍या साधकाला विनम्र अभिवादन ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना एक विशेष पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, ‘‘फक्त शिवराय आणि शिवचरित्र यांवर गेली ८० वर्षे बोलणारे बाबासाहेब हे स्वत: एक विश्वविक्रम आहेत. आयुष्यभर शिवचरित्राची महापूजा मांडणार्‍या साधकाला आपण विनम्र अभिवादन करतो.’’

‘युगपुरुष छत्रपती शिवरायांचा तेजस्वी इतिहास सर्वदूर पोचवण्यासाठी आपण आजही प्रयत्न करत आहात, आपल्याला शंभराव्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा’, असा संदेश खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.