-
परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत अनुपस्थित दाखवल्याचे प्रकरण
-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाचा भोंगळ कारभार !
-
अनुपस्थित विद्यार्थ्यांना नव्याने परीक्षेचा अर्ज करण्यास सांगितले !
नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षेतील तांत्रिक गोंधळामुळे ‘बी.ए., बी.कॉम., बी.सी.ए.’, अशा विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनही गुणपत्रिकेमध्ये अनुपस्थित दाखवण्यात आले होते. विद्यार्थ्यांकडे परीक्षा दिल्याचे पुरावेही आहेत. असे असतांनाही विद्यापीठ स्वतःच्या तांत्रिक चुका न शोधता त्यांचे खापर विद्यार्थ्यांवर फोडले आहे. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना नव्याने परीक्षेचा अर्ज करण्यास सांगितले आहे.
‘ऑनलाईन’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांचा ‘लॉगिन आयडी’ आणि ‘पासवर्ड’ देण्यात आला होता. त्यावरून वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यावर पेपर यशस्वीरित्या जमा झाल्याचा संदेश त्यांच्या भ्रमणभाषवर आलेला दिसतो. त्यामुळे परीक्षा सुरळीत झाल्याचे विद्यार्थी समजले; मात्र निकाल घोषित होताच काही विषयांमध्ये विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी पेपर यशस्वीरित्या दिल्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. असे असतांनाही विद्यापीठ विद्यार्थ्यांची बाजू ऐकून न घेता त्यांना पुन्हा परीक्षेचे अर्ज करण्याच्या सूचना करत आहे. या विरोधात महाविद्यालयांनीही विद्यापिठाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. विद्यापिठाने ‘ऑनलाईन’ परीक्षेतील तांत्रिक गोंधळ शोधावा. एकाच वेळी इतक्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये चुका होणे अशक्य आहे. त्यामुळे व्यवस्थेने स्वत: त्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी आता केली जात आहे.
परीक्षा शुल्क परत देणार का ?
‘‘विद्यापिठाच्या परीक्षार्थींना पुन्हा अर्ज करण्यासाठी ५०० रुपयांचा व्यय येणार आहे, तसेच त्यांना पुन्हा परीक्षाही द्यावी लागणार आहे. विद्यापिठाने तांत्रिक दोष शोधल्यावर पुढे विद्यार्थ्यांचा निकाल ‘उत्तीर्ण’ असा आल्यास परीक्षा शुल्काचे काय ? ते विद्यापीठ परत देणार का ? एकाच परीक्षेतील इतक्या विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखवणे हा विद्यापिठाच्या परीक्षा यंत्रणेतील तांत्रिक गोंधळ आहे; मात्र विद्यापीठ स्वतःच्या तांत्रिक चुका शोधायचे सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा अर्ज करायला सांगत आहे. ही अत्यंत चुकीची भूमिका आहे.’’
– डॉ. आर्.जी. टाले, सचिव आणि प्राचार्य फोरम
(म्हणे) ‘विद्यार्थ्यांकडून होणार्या तांत्रिक चुकांमुळेच गोंधळ झाला !’ – डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा आणि मूल्यांकन मंडळ
विद्यार्थ्यांकडून होणार्या तांत्रिक चुकांमुळेच हा गोंधळ झाला आहे. १०० विद्यार्थ्यांमधून जर ५ मुलांना अनुपस्थित दाखवले असेल, तर त्यात यंत्रणेचा नाही, तर विद्यार्थ्यांचा दोष आहे. आम्ही या संदर्भात अनेकदा पडताळणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या भ्रमणभाषवर वेळोवेळी येणारे संदेश आणि अन्य गोष्टी यांमुळे पेपर अशाप्रकारे ‘ब्लॉक’ होत असून तो योग्यरित्या जमा होत नाही. त्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाला. तरीही ज्यांचे गुण असतील, त्यांना न्याय देण्याचे काम केले जात आहे; मात्र कुणाचीही हानी होऊ नये; म्हणून परीक्षा अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. (विद्यापीठ प्रशासन स्वतःकडून झालेल्या तांत्रिक चुका मान्य न करता त्या विद्यार्थ्यांवर ढकलत आहे. विद्यार्थ्यांकडे परीक्षा दिल्याचे पुरावे असतांनाही विद्यापीठ प्रशासन अशी भूमिका घेते, हे आश्चर्यकारक आहे. शिक्षणमंत्र्यांनी यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, तसेच विद्यापिठातील दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी पालकांची अपेक्षा आहे. – संपादक)