गोव्यात प्रवेश करणार्‍या प्रवाशांमध्ये दिवसागणिक वाढ

पर्यटकांची गर्दी होऊ देऊ नका , केंद्राची गोव्याला चेतावणी

पणजी, ८ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटू लागल्याने गोव्यात प्रवेश करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. गेले काही दिवस राज्याच्या सीमांवर गोव्यात प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांच्या रांगा दिसून येत आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या प्रवाशांना कोणत्याही निर्बंधाविना राज्यात प्रवेश दिला जात आहे, तर इतरांना राज्यात प्रवेश करण्यासाठी कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र समवेत आणावे लागत आहे किंवा सीमेवर कोरोनाविषयक चाचणी करणे बंधनकारक आहे. केरळमधून येणार्‍या प्रवाशांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करणे बंधनकारक आहे. गोवा शासनाने राज्याच्या सीमांवर कोरोना चाचणी करण्यासाठी खासगी चाचणी केंद्रे उभारण्यास मान्यता दिली आहे. या ठिकाणी ‘रॅपिड’ कोरोना चाचणी करण्यासाठी प्रतिचाचणी २५० ते २७० रुपये आकारले जात आहेत.

सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ देऊ नका ! – केंद्राची गोव्याला चेतावणी

पणजी – केंद्रशासनाच्या अखत्यारितील आपत्कालीन विभागीय व्यवस्थापनाने ‘कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने गोव्यातील सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ देऊ नये’, अशी चेतावणी गोवा शासनाला दिली आहे. ‘आपत्कालीन विभागीय व्यवस्थापन’ या विभागाने ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे गोव्यातील अधिकार्‍यांना ही चेतावणी दिली आहे.

‘आपत्कालीन विभागीय व्यवस्थापन’ विभागाने म्हटले आहे की, आगामी पर्यटन हंगामात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत नाही ना, याकडे लक्ष द्यावे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी समुद्रकिनारे, रेल्वेस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन करावे. केंद्राकडून आलेल्या या सूचनेनंतर गोवा शासनाने राज्यातील सर्व संबंधित विभागांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याविषयी कळवले आहे.

‘जिनॉमी सिक्वेन्सिंग’साठी पाठवलेल्या ९४ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचा ‘डेल्टा’ प्रकार सापडला

राज्यातील कोरोनाबाधित १८४ रुग्णांचे कोरोनाविषयक नमुने ‘जिनॉमी सिक्वेन्सिंग’साठी (कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकारासाठी करण्यात येणारी चाचणी) गोव्याबाहेर पाठवण्यात आले होते. यामधील ९४ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचा ‘डेल्टा’ प्रकार आढळला आहे; मात्र कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ हा विनाशकारी विषाणू सापडलेला नाही.

‘व्हॉट्सॲप’वर संदेश पाठवून मिळवा कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतल्याचे प्रमाणपत्र

‘व्हॉट्सॲप’वर कोरोना प्रमाणपत्र

कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांसाठी ‘MyGov Corona Helpdesk’च्या माध्यमातून ‘व्हॉट्सॲप’वर संदेश पाठवून कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. यासाठी इच्छुकांनी केवळ ९०१३१५१५१५ या क्रमांकावर ‘व्हॉट्सॲप’ संदेश पाठवायचा आहे आणि त्यानंतर‘व्हॉट्सॲप’ संदेशाद्वारे येणार्‍या सूचनांचे पालन करायचे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध झाली आहे.