नांदेड – मी प्रशासकीय अधिकार्यांसमवेत कुठलीही आढावा बैठक घेतलेली नाही. मी माझ्या अखत्यारीत असलेल्या विषयांवर प्रशासनातील अधिकार्यांशी बोललो आहे. मला राज्यघटनेने तेवढा अधिकार दिला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ६ ऑगस्ट या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले. येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी त्यांनी राज्य सरकारच्या कुठल्याही विषयावर भाष्य करणे टाळले.
राज्यपाल भगतसिंह हे मराठवाड्याच्या दौर्यावर आहेत. या दौर्यात ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासह काही ठिकाणी आढावा बैठकाही घेणार आहेत, असे समजल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खेद व्यक्त केला होता, तसेच ‘राज्यपाल सरकारच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत आहेत’, असा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केला होता. याविषयी राज्यपाल कोश्यारी यांनी वरील प्रत्युत्तर दिले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, ‘कोविड’च्या काळात मला येता आले नाही, यासाठी आता नांदेड जिल्ह्याचा दौरा केला आहे. मला राज्यघटनेने दिलेले अधिकार वापरून विकासाच्या संदर्भात मी काही अधिकार्यांशी चर्चा केली; मात्र या संदर्भात राजकारण्यांकडून राजकारण केले जात आहे, ते त्यांना करू द्या; परंतु ‘पत्रकार तर राजकारण करत नाहीत ना ?’, असा उपरोधिक प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला.
भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापिठात चालू असलेल्या विविध उपक्रमांना भेटी देऊन त्यांचे कौतुक केले, तसेच ‘यापुढे विद्यापिठासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ’, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी त्यांनी ‘स्वाराती’ विद्यापिठातील वसतीगृह उद्घाटनाचा कार्यक्रम टाळला. यावरून उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी टीका केली होती.