२१ दिवसांची समयमर्यादा असतांना केवळ ६ दिवसांची मुदत ठेवली जाते, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी !
सातारा, १ ऑगस्ट (वार्ता.) – सातारा जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे सातारा जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे यांच्या ५६ पैकी ४९ बंधार्यांना झळ बसली असून अनुमाने ३ कोटी ५० लाख रुपयांची हानी झाली आहे. असे असतांना वर्ष २०२१-२२ मध्ये नव्याने बांधण्यात येणार्या लघु पाटबंधारेच्या बंधार्यांची निविदाप्रक्रिया ६ दिवसांची ठेवण्यात आली आहे. प्रत्यक्षात शासननियमानुसार निविदाप्रक्रिया २१ दिवसांची असते; मात्र निविदाप्रक्रिया अल्प दिवसांची ठेवून नियमांचे उल्लंघन केले जात आहे का ? अशा तक्रारी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी विनय गौडा यांच्याकडे करण्यात येत आहेत.
सातारा जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने ५६ बंधार्यांच्या कामांसाठी निविदाप्रक्रिया राबवण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये माण, कराड, जावळी, फलटण, खटाव, पाटण, सातारा, कोरेगाव आणि वाई तालुक्यांचा समावेश आहे. शासननियमानुसार १८ लाख रुपयांच्या कामांसाठी २१ दिवसांची मुदत असते; मात्र येथे केवळ ६ दिवसांची मुदत देण्यात आली. त्यामुळे ही निविदाप्रक्रिया वादाच्या भोवर्यात सापडण्याची शक्यता आहे.