१. स्वेच्छानिवृत्तीनंतर मुंबई जिल्ह्याच्या ग्रंथांचा साठा आणि त्यांच्या विक्रीचे अहवाल सिद्ध करण्याची सेवा मिळणे अन् ते अहवाल तपासणीसाठी अरविंद गाडगीळ यांना पाठवावे लागणे
‘वर्ष २००३ मध्ये मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर गुरुकृपेने मला माझी पहिली सेवा म्हणून मुंबई जिल्ह्यातील सर्व भाषांच्या सनातनच्या ग्रंथसाठ्याची सेवा मिळाली. ‘मुंबई जिल्ह्यातील साधकांना त्यांच्या मागणीनुसार ग्रंथ विक्रीसाठी देणे आणि त्यांचे अहवाल आल्यानंतर ते सर्व एकत्रित करून प्रत्येक भाषेच्या ग्रंथांचे अहवाल सिद्ध करणे’, असे त्या सेवेचे स्वरूप होते. प्रत्येक जिल्ह्याचे अहवाल देवद येथील आश्रमात पाठवायला लागायचे आणि अरविंद गाडगीळकाका ते सर्व अहवाल पडताळायचे.
२. ग्रंथांच्या सेवेची व्याप्ती पुष्कळ असल्याने त्यात चुका होणे आणि त्याचा ताण येऊन वाईट वाटणे; परंतु गाडगीळ यांनी प्रेमाने चुका दाखवणे अन् त्यातून त्यांची गुरुकार्याची तळमळ लक्षात येणे
मुंबई जिल्हा मोठा असल्यामुळे अहवालांची व्याप्तीही पुष्कळ मोठी होती. त्या वेळी बरेच ग्रंथ असे होते की, एकाच ग्रंथाचे मूल्य त्याच्या आवृत्तीनुसार वेगवेगळे होते. त्यामुळे माझा बराच गोंधळ व्हायचा आणि अहवालात चुका व्हायच्या. ‘अहवालात चुका होतात’, असा विचार करून मला ताण येऊन वाईट वाटायचे. त्या वेळी गाडगीळकाका ते अहवाल पडताळून मला ‘माझ्या चुका कुठे झाल्या आहेत ?’, ते प्रेमाने दाखवून द्यायचे. त्यासंदर्भात चर्चा करतांना त्यांचे बोलणे सूत्रबद्ध असायचे. त्यांच्या बोलण्यात कधीही ‘मी श्रेष्ठ आहे, समोरचा साधक किती चुका करत आहे’, असा शिकवण्याचा भाग मुळीच नसायचा. केवळ ‘गुरुकार्य परिपूर्ण व्हायला हवे’, अशी त्यांची तळमळ त्यांच्या बोलण्यात दिसून यायची.
३. सेवा परिपूर्ण होण्याची तळमळ गाडगीळकाका यांच्या माध्यमातून मनावर बिंबणे आणि प्रार्थना अन् शरणागतीने प्रयत्न केल्यावर हळूहळू अहवाल अचूक सिद्ध करण्याची तळमळ वाढणे
ही सेवा माझी पहिली मोठी सेवा होती. ‘परिपूर्ण सेवा कशी करायला हवी ?’, ते माझ्या मनावर गाडगीळकाका यांच्या माध्यमातून बिंबले. त्यानंतर मी ‘प्रत्येक अहवाल अचूक कसा होईल ?’, याकडे लक्ष ठेवून ती सेवा करायचे. त्यासाठी प्रत्येक टप्प्यावर प्रार्थना, शरणागती आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्या वेळी असे लक्षात यायचे, ‘जेव्हा प्रार्थना अल्प व्हायच्या, तेव्हा अहवालात चुका व्हायच्या.’ त्यामुळे मला प्रार्थना करून अहवालात प्रत्येक नोंद करण्याचा ध्यास लागला. ‘मी गुरुदेवांना अपेक्षित असा अहवालच गाडगीळकाकांना पाठवायला पाहिजे’, अशी माझी तळमळ प्रचंड वाढली. हळूहळू माझ्या चुका अल्प होत गेल्या. जेव्हा माझा अहवाल अचूक सिद्ध व्हायला लागला, त्या वेळी ‘गाडगीळकाकांनी मला परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, हे शिकवले, यासाठी त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटायला लागली.
गाडगीळकाका यांच्याकडून शिकायला मिळालेल्या परिपूर्ण सेवा करण्याच्या सवयीचा लाभ त्यानंतर मला पुणे जिल्ह्यात स्थलांतरित झाल्यावर वेगवेगळ्या सेवा करतांना झाला. प.पू. गुरुदेवांनी गुणी साधक सिद्ध केल्याविषयी, तसेच त्यांच्यासह मला सेवा करायची संधी दिली, यासाठी मी त्यांच्या चरणी अत्यंत कृतज्ञ आहे.’
– सौ. देवी कपाडिया (६२ टक्के आध्यात्मिक पातळी), सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२५.७.२०२०)