नवी देहली – ‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरणी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी करण्यात येणार आहे. सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेमध्ये न्यायालयातील एक विद्यमान आणि एक निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली ‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून प्रचंड गदारोळ माजला आहे.
काय आहे पेगॅसस प्रकरण ?
काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि युरोप येथील काही प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले होते की, इस्रायलमधील ‘पेगॅसस स्पायवेअर’ या संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने भारतासह जगातील अनेक देशांमधील पत्रकार, नेते आणि मोठ्या व्यक्तींचे दूरभाषवरील संभाषण गोपनीयरित्या ध्वनीमुद्रित (टॅप) करण्यात आले. हे वृत्त प्रसारित झाल्यापासून भारतातील विरोधी पक्षांकडून केंद्रशासनावर टीका केली जात आहे.