ऐन पावसाळ्यात जनावरांचे लसीकरण ठप्प !
आंदोलन करतांना जनावरांवरील उपचार थांबवणे हे कितपत योग्य ? जनावरांचे मृत्यू होऊ देणार्या असंवेदनशील पशूवैद्यकीय चिकित्सकांना वेळीच खडसवायला हवे !
नागपूर – ‘पदवीधर पशूवैद्यकीय आधुनिक वैद्यांप्रमाणेच जनावरांवर सर्व प्रकारच्या उपचाराची अनुमती मिळावी’, या मागणीसाठी राज्यभरातील पदविकाधारक पशूवैद्यकीय आधुनिक वैद्यांनी (पशूधन पर्यवेक्षक/ सहा पशूधन विकास अधिकारी) जनावरांवर उपचार करणे थांबवल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जनावरांचा उपचारांअभावी मृत्यू होत आहे. दुसरीकडे पावसाळ्यात होणारे जनावरांचे लसीकरणही थांबवल्याने रोगांची साथ पसरून मृत्यू वाढण्याचा धोकाही वाढला आहे.
राज्यात शासनाची पशूवैद्यकीय श्रेणी दोनची एकूण २ सहस्र ८६३ रुग्णालये असून तेथे ४ सहस्र ५०० हून अधिक पदविकाधारक पशूवैद्यकीय आधुनिक वैद्य काम करत आहेत, तर राज्यात श्रेणी एकची अनुमाने १ सहस्र रुग्णालये असून तेथे पदवीधर पशूवैद्यकीय अधिकारी सेवा देतात. पदविकाधारक आधुनिक वैद्यांनी १५ जूनपासून जनावरांचे लसीकरण थांबवले असून १६ जुलैपासून कायद्यानुसार काम आंदोलनाला प्रारंभ केला आहे.
या अंतर्गत ते पदवीधर आधुनिक वैद्यांच्या उपदेशाने काम करत आहेत. पशूपालकांना पदवीधर आधुनिक वैद्यांकडे जाण्याचा उपदेश देतात. आधुनिक वैद्य येईपर्यंत पदवीधर जनावरांवर उपचार करत नाहीत. याचा फटका पशूपालकांना बसू लागला आहे. नागपूर, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र येथे त्यांच्या डोळ्यांदेखत उपचाराअभावी जनावरांचे मृत्यू होत आहेत.