शिरोली पुलाची (जिल्हा कोल्हापूर) – सांगली फाटा येथे महापुराचे पाणी आल्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे महामार्गावर २ सहस्र वाहने अडकून पडली आहेत. या पाण्याच्या प्रवाहातून १ चारचाकी वाहन, तर १० दुचाकी वाहने वाहून गेली आहेत. स्थानिक मच्छीमाराच्या साहाय्याने ३ घंट्यांनंतर चारचाकी वाहनचालकाला वाचवण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. पुण्याच्या दिशेने जाणार्या मार्गावर ५ फूट पाणी असून कोल्हापूरच्या दिशेने जाणार्या मार्गावर ४ फूट पाणी आहे.
५ ऑगस्ट २०१९ मध्ये महामार्गावर पाणी आले होते, तेव्हा ८ दिवस महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या वेळी वर्ष २०१९ च्या तुलनेत वेगाने पाणी वहात असून महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महामार्गावरील वाहतूक बॅरिकेट्सच्या साहाय्याने बंद करण्यात आली आहे.