गेल्या ४ वर्षांत ईदसाठी होणार्‍या गोवंशियांच्या हत्येत घट झाल्याचा प्रशासनाचा दावा !

गोवंश रक्षकांच्या वैध प्रयत्नांमुळेच ही घट झाली आहे. त्यापूर्वी गोवा मांस प्रकल्पात अल्पवयीन गोवंशियांची आणि नियमांचे पालन न करता हत्या केली जात होती !

पणजी, २१ जुलै (वार्ता.)  गेल्या ४ वर्षांपासून उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प पूर्णपणे कार्यरत नसल्याने येथे हत्या करण्यात येणार्‍या गोवंशाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत अल्प झाले आहे. पूर्वी ‘ईद-उल-झुआ’च्या वेळी १०० गोवंशियांची हत्या केली जात असे; परंतु यावर्षी ते प्रमाण केवळ ६ आहे.

याविषयी पशूसंवर्धन आणि वैद्यकीय चिकित्सा खात्यातील एक अधिकारी म्हणाले, ‘‘वर्ष २०१६ मध्ये ‘कुर्बानी’साठी १२० गोवंशियांची हत्या करण्यात येत होती. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये ही संख्या ६० वर आली. वर्ष २०२० मध्ये ही संख्या आणखी अल्प होऊन यंदाच्या वर्षी ती ६ गोवंशावर आली आहे. पशूसंवर्धन आणि वैद्यकीय चिकित्सा खात्याने ‘कुर्बानी’साठी पशूवधगृह (गोवा मांस प्रकल्प) सिद्ध केला आहे आणि योग्य ती दक्षता घेऊन येथे प्राणी आणण्यात येतील. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘प्रिव्हेंशन टू क्रूएल्टी अ‍ॅक्ट १९६०’, ’अ‍ॅनिमल प्रोटेक्शन अ‍ॅक्ट, १९३५’ आणि ‘प्रिव्हेंशन टू क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल्स २००१’ या नियमांनुसार या प्राण्यांची हत्या करण्यात येईल.’’

बकरी ईदच्या निमित्ताने विविध ठिकाणी अवैधरित्या गोवंश हत्या केली जाते. त्यासाठी गोवंशियांना अवैधपणे आणण्यात येते. ही अवैध वाहतूक रोखण्याविषयी गोरक्षकांनी २० जुलै या दिवशी दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंह यांना निवेदन दिले होते.