पिंपरी – येथील महापालिका रुग्णालये, कोरोना काळजी केंद्र, अतीदक्षता विभाग, औषध साठा, प्राणवायूची उपलब्धता आदींची पूर्तता करून कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेसाठी पिंपरी पालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यासाठी होणार्या व्ययाची व्यवस्था कोरोना निधीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे केली आहे. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात ४ था माळा पूर्णपणे राखीव ठेवला असून, त्या ठिकाणी २०० ते ८०० रुग्णांच्या व्यवस्थेसह २ अतीदक्षता विभाग असणार आहेत. यासमवेत पिंपरीतील जिजामाता रुग्णालय, चिखलीतील घरकुल प्रकल्पाच्या चार इमारती, नेहरूनगर येथील कोरोना काळजी केंद्र, चिंचवड येथील ‘ऑटो क्लस्टर काळजी केंद्र’ही उपलब्ध असणार आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता गृहीत धरून आवश्यक त्या सर्व उपाययोजना पिंपरी महापालिकेने केल्या असल्या, तरी नागरिकांनी आरोग्यविषयक नियमांचे पालन करून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.