पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – यंदाच्या वर्षी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेमध्ये सहभागी होण्याचा मान श्री विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना प्राप्त झाला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे मानाच्या वारकर्यांची निवड करण्यात आली.
केशव कोलते हे वर्धा येथील रहिवासी असून मागील २० वर्षांपासून ते श्री विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा करत आहेत. मागील २ वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन रांगेतील भविकांतून मानाचा वारकरी निवडता येत नसल्याने मंदिरात सेवा करणार्या भाविकांतून ही निवड केली जात आहे. आपण केलेली सेवा फलद्रूप झाली आणि विठुरायाचे पूजा करण्याचे भाग्य लाभले, अशी प्रतिक्रिया कोलते यांनी व्यक्त केली.