सावंतवाडी शहरातील एका खासगी ‘कोविड केअर सेंटर’ने व्हेंटिलेटरची सुविधा नसतांनाही रुग्णाला त्याचे शुल्क आकारले !

मनसेच्या पदाधिकार्‍यांनी आवाज उठवताच तहसीलदारांनी केली ‘कोविड केअर सेंटर’ची पहाणी

मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार ! याला उत्तरदायी असणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

व्हेंटिलेटर

सावंतवाडी – शहरातील एका खासगी ‘कोविड केअर सेंटर’मध्ये व्हेंटिलेटर नसतांनाही त्याचे देयक आकारले गेल्याच्या प्रकरणी मनसेच्या संतप्त पदाधिकार्‍यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह त्या खासगी कोविड केअर सेंटरची पहाणी केली. या वेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ‘संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येईल’, असे आश्वासन दिले.

शहरातील एका रुग्णाची ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्याला एका खासगी कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते; मात्र त्या रुग्णाची ऑक्सिजनची पातळी पुष्कळ खाली आल्याने त्याला अन्य रुग्णालयात भरती करण्यास सांगण्यात आले. या वेळी ‘त्या रुग्णावर एक दिवस केलेल्या उपचाराचे २३ सहस्र रुपयांचे देयक त्याने भरल्यानंतर त्याला सेंटरमधून सोडण्यात येईल’, असे सेंटरकडून सांगण्यात आले. त्या रुग्णाने देयक भरून पुढील उपचार बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात घेतले. तेथे

१५ दिवस उपचार केल्यानंतर तो रुग्ण बरा होऊन घरी परतला. त्यानंतर त्या रुग्णाच्या पत्नीने सावंतवाडी येथील कोविड सेंटरने देयक देतांना त्यात व्हेंटिलेटरची सुविधा नसतांनाही त्याचे शुल्क आकारल्याचे लक्षात आल्यावर मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांना संपर्क करून सर्व प्रसंग सांगितला. त्यानंतर उपरकर यांनी सावंतवाडी येथील मनसेच्या पदाधिकार्‍यांना याविषयीची माहिती दिल्यावर पदाधिकार्‍यांनी ही गोष्ट तहसीलदार म्हात्रे यांच्या निदर्शनास आणून दिली.