वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री अन्नपूर्णामाता मंदिराचे महंत रामेश्‍वर पुरी यांचा देहत्याग !

महंत रामेश्‍वर पुरी

वाराणसी, १२ जुलै (वार्ता.) – येथील प्रसिद्ध श्री अन्नपूर्णामाता मंदिराचे महंत रामेश्‍वर पुरी यांनी ११ जुलै या दिवशी देहत्याग केला. काही दिवसांपासून लक्ष्मणपुरी येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  उपमहंत शंकर पुरी यांना दूरभाष करून महंत रामेश्‍वर पुरी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती, तसेच आवश्यक साहाय्य करण्याचे आश्‍वासनही दिले होते.

सनातन संस्थेशी असलेले संबंध

महंत रामेश्‍वर पुरी यांचे नेहमीच सनातन संस्थेला आशीर्वाद मिळत राहिले आहेत. प्रयागराज आणि उज्जैन येथील कुंभमेळ्यांच्या वेळी त्यांनी सनातनच्या १०० साधकांची भोजनाची व्यवस्था केली होती.

श्री अन्नपूर्णामाता मंदिराची माहिती 

काशी विश्‍वनाथ मंदिरापासून काही अंतरावरच श्री अन्नपूर्णामातेचे मंदिर आहे. श्री अन्नपूर्णामातेला तिन्ही लोकांची माता मानले जाते. श्री अन्नपूर्णामातेने स्वयं भगवान शिवाला भोजन भरवले होते. श्री अन्नपूर्णामाता मंदिरामध्ये आद्य शंकराचार्य यांनी ‘श्री अन्नपूर्णा स्तोत्रा’ची रचना करून ज्ञान आणि वैराग्य यांच्या प्राप्तीची कामना केली होती.