रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेल्या सनातनच्या ८६ व्या संत पू. शालिनी माईणकरआजी यांनी ११.५.२०२१ ला रात्री १.३८ वाजता देहत्याग केला. आज १०.७.२०२१ या दिवशी त्यांचे द्वितीय मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने पू. आजी आणि सनातनचे बालसंत पू. भार्गवराम यांच्यामधील प्रीती दर्शवणारे प्रसंग येथे देत आहोत.
१. पू. भार्गवराम यांनी आईचा हात धरून तिला पू. माईणकरआजींच्या खोलीत नेणे, त्यांनी पू. आजींशी पुष्कळ वेळ बोलणे आणि त्यांच्यातील प्रीतीचा वर्षाव पाहून आईची भावजागृती होणे
‘एकदा पू. भार्गवराम रामनाथी आश्रमाच्या मार्गिकेतून जात होते. त्यांनी माझा हात धरून मला पू. माईणकरआजींच्या खोलीत नेले. तेथे गेल्यावर पू. भार्गवराम खाली बसले. ते पू. माईणकरआजींशी पुष्कळ वेळ बोलत होते. (पू. भार्गवराम अत्यल्प वेळा असे करतात.) आम्हाला त्या दोघांचे बोलणे समजत नव्हते; परंतु त्यांच्यातील प्रीतीचा वर्षाव पाहून माझी भावजागृती होत होती.
२. पू. आजींनी दिलेल्या आंब्याच्या फोडी पू. भार्गवराम यांनी खोलीतील साधिकांना देणे आणि नंतर उरलेल्या सर्व फोडी अन् चॉकलेट खाणे
पू. भार्गवराम खोलीत गेल्यानंतर पू. माईणकरआजींच्या कन्येने (सौ. पुरोहितमावशींनी) पू. भार्गवराम यांना पू. आजींच्या हातून आंबा आणि चॉकलेट दिले. पू. भार्गवराम यांनी आंब्याच्या लहान फोडी खोलीत असलेल्या साधिकांना दिल्या आणि नंतर स्वतः आंब्याच्या फोडी अन् चॉकलेट खाल्ले. एरव्ही त्यांना प्रसाद म्हणून २ फोडी दिल्यास ते त्यांतील एकच फोड घेतात.
३. पू. आजींनी त्यांच्या ताटातून दिलेला घास पू. भार्गवराम यांनी भावपूर्णरित्या ग्रहण करणे
एकदा पू. भार्गवराम यांना भोजन करायचे नव्हते. त्या दिवशी ते पू. माईणकरआजींच्या हातून त्यांच्या ताटातील मऊ भात आणि दुसर्या दिवशी डोसा खाण्यासाठी हट्ट करत होते. पू. भार्गवराम यांनी अत्यंत भावपूर्णरित्या पू. आजींनी दिलेला घास खाल्ला.
४. या प्रसंगांतून मला जाणवले, ‘पू. भार्गवराम यांना पू. माईणकरआजींमधील स्थायीभाव, प्रीती आणि भाव यांची अन् त्यांच्या संतत्वाची स्पंदने समजत होती.’
पू. माईणकरआजींनी देहत्याग केल्याचे समजल्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर वरील प्रसंग तरळले. ‘पू. भार्गवराम यांना पू. आजींचा आशीर्वाद मिळाला’, याविषयी मला कृतज्ञता वाटली.’
– सौ. भवानी प्रभु, मंगळुरू (२०.५.२०२१)