श्रीलंकेमध्ये चीनचे सैनिक काम करत असल्याने स्थानिक नागरिकांकडून विरोध !

श्रीलंकेच्या नागरिकांनी चीनच्या विरोधात संघटित होऊन त्याला हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अन्यथा चीनने श्रीलंकेला गिळंकृत केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेने त्याच्या देशातील हंबनटोटा बंदर विकसित करण्यासाठी चीनला दिले आहे. चीनच्या काही सैनिकांना येथील प्राचीन तलावाजवळ काम करत असतांना स्थानिक नागरिकांनी पाहिल्यावर त्यांच्याकडून सैनिकांचा विरोध करण्यात आला. हे सैनिक गणवेशात असल्याने स्थानिक नागरिकांच्या ते लक्षात आले. दुसरीकडे श्रीलंकेतील चीनच्या दूतावासाने गणवेश घातलेले त्याचे सैनिक असल्याचा दावा फेटाळला आहे. ‘चीन सैन्याच्या गणवेशासारखे कपडे त्यांनी घातले असले, तरी ते चिनी  सैनिक नाहीत’, असे दूतावासाने स्पष्टीकरण दिले आहे. (जर ते कामगार असतील, तर ते चिनी सैन्यासारखे गणवेश असणारे कपडे का घालत आहेत? याचे उत्तर चीन का देत नाही ? – संपादक) श्रीलंकेच्या सरकारनेही चिनी सैनिकांच्या उपस्थितीचा दावा फेटाळला आहे. ‘चीन सैन्यासारखे कपडे घातलेले हे चिनी कामगार आहेत’, असे सरकारने म्हटले आहे. श्रीलंकेच्या कायद्यानुसार सैन्यात नसणार्‍यांनी सैनिकी वेश परिधान करणे गुन्हा आहे. त्यानुसार अटक आणि शिक्षा होऊ शकते.

१. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार चीनकडून तलावाजवळ काम करत असतांना पुरातत्व विभागाकडून अनुमतीही घेतली नसल्याचे समोर आले आहे. (चीनने श्रीलंकेत पाऊल ठेवल्यापासूनच श्रीलंकेवर मालकी हक्क गाजवण्यास चालू केले आहे, हेच यातून लक्षात येते ! – संपादक)

२. या घटनेविषयी श्रीलंकेचे खासदार आणि ‘फिल्ड मार्शल’ उपाधी मिळालेले सरथ फोन्सेका यांनी अप्रसन्नता नोंदवत ‘चीनचे सैनिक आणि अधिकारी देशात घुसून काम करत आहेत’, असे म्हटले आहे.

३. श्रीलंकेने चीनला ‘कोलंबो पोर्ट सिटी’ प्रकल्पही ९९ वर्षांच्या करारावर दिला आहे. याचाही विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे.