अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम मराठीतून शिकता येणार !

‘सीओईपी’ आणि ‘पीसीओई’ महाविद्यालयांचा मराठी अभ्यासक्रमासाठीचा प्रस्ताव मान्य !

पुणे – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आणि निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीओई) या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मराठी माध्यमातून शिकता येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने प्रादेशिक भाषांमधून अभियांत्रिकी अभ्यासक्रम उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. यासाठी महाविद्यालयांकडून प्रादेशिक भाषांतील अभ्यासक्रमांचे प्रस्ताव मागविले होते. याला ‘सीओईपी’ आणि ‘पीसीओई’ या महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठविले. त्यानुसार ‘सीओईपी’च्या स्थापत्य अभियांत्रिकी, उत्पादन शास्त्र आणि अभियांत्रिकी तसेच संगणक अभियांत्रिकी या ३ अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. तर ‘पीसीओई’च्या संगणक अभियांत्रिकी या एका अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे.

मराठीतून अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ६० जागांची स्वतंत्र तुकडी असेल. एआयसीटीई आणि राज्यशासनाकडून मान्यता मिळाल्यास यंदापासून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.
‘सीओईपी’मध्ये आधी अभ्यास साहित्याची निर्मिती करून पुढील वर्षी प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया राबवणार आहे. उत्पादन शास्त्र आणि अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांऐवजी विद्युत् अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी विद्यापिठाकडे मान्यता मागितली असल्याचे ‘सीओईपी’चे संचालक डॉ. भारतकुमार आहुजा यांनी सांगितले.