इगतपुरी (नाशिक) येथील ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४ अभिनेत्रींसह २२ जणांना अटक !

  • पार्टीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा वापर   

  • धागेदोरे विदेशापर्यंत असल्याची शक्यता

त्याग शिकवणारी भारतीय संस्कृती कुठे आणि भोगविलासात बुडवणारी पाश्चात्त्य विकृती कुठे ? हिंदूंच्या प्रथा-परंपरा यांवर पुरोगामी मंडळी नेहमी टीका करतात; मात्र पाश्चात्त्य कुप्रथांच्या या व्यभिचारी अंधानुकरणाविषयी तोंडातून ‘ब्र’ही काढत नाहीत. यातून पुरोगाम्यांची टोळी केवळ हिंदु धर्माची अपकीर्ती करण्यासाठीच कार्यरत असल्याचे स्पष्ट होते.

‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांनी धाड टाकून ४ अभिनेत्रींसह २२ जणांना अटक केली

मुंबई – मुंबई-आगरा राष्ट्रीय महामार्गावर इगतपुरी येथील ‘स्काय ताज व्हिला’ या ‘रिसॉर्ट’मध्ये चालू असलेल्या ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांनी धाड टाकून ४ अभिनेत्रींसह २२ जणांना अटक केली आहे. २७ जूनच्या रात्री २ वाजता नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये मराठी अभिनेत्री हिना पांचाळ हिच्यासह हिंदी आणि तेलुगु चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींचा, तसेच एका विदेशी महिलेचाही समावेश आहे.

पार्टीच्या ठिकाणी पोलिसांना हुक्का, कोकेन, हेरॉईन आदी अमली पदार्थ सापडले आहेत. या ‘पार्टी’चे धागेदोरे विदेशापर्यंत पोचल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अटक करण्यात आलेल्यांना स्थानिक न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता ४ जणांना ६ जुलैपर्यंत, तर अन्यांना १ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांपैकी ४ जणांनी अमली पदार्थांचे सेवन, तर अन्यांनी मद्यप्राशन केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी ३३ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

१. मुंबईतील पियुष नामक व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी चालू होती. रात्री १२ वाजता केक कापून झाल्यावर अमली पदार्थांचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत नाच चालू होता.

२. अटक करण्यात आलेल्यांमध्ये १२ महिला आणि १० पुरुष यांचा समावेश आहे. पोलिसांनी कारवाईच्या वेळी ‘कॅमेरे’, ‘ट्रायपॉड’, गाड्या आदी शासनाधीन करण्यात आले आहे.