आजच्या तरुण पिढीने हिंदूंच्या शौर्य परंपरेचा आदर्श घेणे आवश्यक आहे ! – कु. मृणाल जोशी, हिंदु जनजागृती समिती

पुणे येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदानदिनानिमित्त ‘ऑनलाईन महिला शौर्यजागृती व्याख्याना’चे आयोजन !

​पुणे – शौर्य हे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, राणी चेनम्मा, स्वातंत्र्यसेनानी प्रीतीलता वड्डेदार, धैर्यशील अवंतीबाई लोधी यांसारख्या वीरांगना, तसेच अनेक शूरवीर आणि स्वातंत्र्यसेनानी येतात. असे असले, तरी शौर्याची परंपरा असलेल्या भारतात त्यांचा पराक्रम, त्यांचे बलीदान, त्यांचे धर्मप्रेम आणि राष्ट्रप्रेम शिकवले जात नाही, हे अत्यंत दयनीय आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी सक्षम होण्याची आणि धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करण्याची आवश्यकता आहे. सध्या लव्ह जिहाद, महिलांवरील बलात्कार आणि हिंदूंवरील अत्याचार यांचे प्रमाण वाढत चालले आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आजच्या तरुण पिढीने हिंदूंच्या शौर्य परंपरेचा आदर्श घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. मृणाल जोशी यांनी केले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदानदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन महिला शौर्यजागृती व्याख्याना’त त्या बोलत होत्या.

​या कार्यक्रमात शौर्य जागवणारी आणि स्वरक्षणाची ‘ऑनलाईन’ प्रात्यक्षिके एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आली. या व्याख्यानाचा लाभ ११६ धर्मप्रेमींनी घेतला. व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. गार्गी पाटील यांनी केले.

विशेष : ​या व्याख्यानामध्ये दाखवलेली ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके पाहून सर्वांसाठी ७ दिवसांच्या शौर्यवर्गाचे नियोजन करण्यात आले.