इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात चालू करण्यात येणार्‍या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमाला अंनिसकडून विरोध !

  • हिंदु धर्मातील शास्त्रांना विरोध करण्यासाठी पुढे असलेल्या अंनिसने कधी अन्य पंथियांच्या धार्मिक पुस्तकांमध्ये भूत, पिशाच्च आदींच्या उल्लेखाविषयी कधी तरी आक्षेप घेतला आहे का ?

  • आतापर्यंत ज्योतिषशास्त्राने सांगितलेल्या घटना सत्य झाल्याची सहस्रावधी उदाहरणे आहेत. एखादे शास्त्र पटले नाही किंवा त्याचा अभ्यास नाही; म्हणून ते शास्त्रच खोटे आहे, असे म्हणणे हीच खरी विवेकशून्यता होय.

मुंबई – इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात वर्ष २०२१ पासून ज्योतिषशास्त्राचा पदव्युत्तर (एम्.ए.) आणि पदविका (डिप्लोमा) अभ्यास चालू करण्यात येणार आहे. विद्यापिठाच्या ५७ प्रादेशिक केंद्रांवर हिंदी आणि संस्कृत भाषांतून हा अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे; मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या अभ्यासक्रमाला विरोध दर्शवत अभ्यासक्रम रहित करण्याची मागणी केली आहे.


१. हा अभ्यासक्रम २ वर्षांचा असून तो ‘ऑनलाईन’ पद्धतीने शिकवण्यात येणार आहे. यासाठी ‘ऑनलाईन’ प्रवेश घेता येणार आहे.

२. ‘मानवी जीवनावर ग्रह आणि तारे यांचा होणारा परिणाम’, यावर हा अभ्यासक्रम आधारित असेल. या अभ्यासक्रमाला स्वतंत्र विद्याशाखेचा दर्जा असणार आहे.

३. या अभ्यासक्रमात भारतीय ज्योतिषाचा परिचय आणि इतिहास, सिद्धांत ज्योतिष अन् काळ, पंचांग, मुहूर्त, कुंडली, फलविचार, गणित, ग्रहणवेध अन् यंत्र, संहिता ज्योतिष, ज्योतिर्विज्ञान, वेदांग ज्योतिष आदींचा समावेश असणार आहे.

४. यापूर्वी वर्ष २००१ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम चालू केला होता; मात्र त्या वेळी काही वैज्ञानिकांनी केलेल्या विरोधामुळे हा अभ्यासक्रम रहित करण्यात आला होता.

ज्योतिष विज्ञानाधिष्ठित शास्त्र असून अंनिसचा विरोध केवळ अपकीर्ती करण्यासाठी ! – प्रा. नरेंद्र धारणे, ज्योतिष अभ्यासक

ज्योतिष हे वेदकालीन प्राचीन आणि विज्ञानाधिष्ठित शास्त्र आहे. एखाद्या विषयाची माहिती त्या क्षेत्रातील तज्ञांनी देणे आणि अभ्यासकाने देणे यांमध्ये भेद आहे. तज्ञ त्याविषयाची अचूक माहिती देऊ शकतो; मात्र अभ्यासकाने दिलेली माहिती चुकीची ठरू शकते; म्हणून ‘ते शास्त्र चुकीचे आहे’, असे म्हणणे अयोग्य आहे. ज्योतिषशास्त्र हे भारताचे वैभव आहे. अनेक देशांत यापूर्वीच ज्योतिषशास्त्रावर अभ्यासक्रम चालू करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही अनेक मोहिमा ज्योतिषशास्त्राच्या मुहूर्तावर केल्या आहेत. माझ्याकडे ज्योतिष जाणून घेण्यासाठी गरीब, सामान्य आणि मंत्रीही येतात. समाजात ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा म्हणणारे मंत्री त्यांच्या खासगी जीवनात मात्र याच शास्त्राचा आधार घेतात. अंनिस केवळ या शास्त्राची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीही मी अंनिसची अनेक आव्हाने स्वीकारली आहेत. यापुढेही अंनिसचे कोणतेही आव्हान स्वीकारायला मी सिद्ध आहे, अशी प्रतिक्रिया प्रा. नरेंद्र धारणे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिली.

(म्हणे) ‘ज्योतिष विज्ञानावर टिकणारे नाही !’ – प्रा. नितीन शिंदे, राज्य कार्यकारिणी सदस्य, अंनिस

ग्रह-तारे हे पृथ्वीपासून प्रचंड अंतरावर आहेत. त्यांचा अभ्यास करणारे खगोलशास्त्र स्वतंत्र आहे. वर्ष १९७५ मध्ये ज्योतिषशास्त्राला जगभरातील वैज्ञानिकांनी विरोध केला होता. ज्योतिष हे विज्ञानावर टिकणारे नाही. यामुळे समाजाची फसवणूक होईल, अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. नितीन शिंदे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिली.