मुंबईतील २ सहस्रांहून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याची राज्य सरकारची न्यायालयात माहिती

  • कोरोनावरील बनावट लसीकरणाचे प्रकरण

  • नागरिकांच्या शरिरात प्रतिपिंडे निर्माण झाली का ? याची पडताळणी करण्याचा न्यायालयाचा आदेश

मुंबई – मुंबईमध्ये विविध ठिकाणी झालेल्या कोरोनावरील बनावट लसीकरणामुळे  २ सहस्र ५३ नागरिकांची फसवणूक झाली, अशी माहिती राज्य सरकारने २४ जून या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात दिली. ज्या नागरिकांनी लस घेतली, त्यांच्या शरिरात प्रतिपिंडे (ॲन्टीबॉडिज) निर्माण झाली आहेत का, याची पडताळणी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस्. कुलकर्णी यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. असे प्रकार घडू नयेत, यासाठी ५ दिवसांत योजना सिद्ध करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

या वेळी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारला सूचना करतांना न्यायालयाने म्हटले की, लस घेतलेल्या लोकांची नेमकी स्थिती काय आहे ? हे पडताळणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी आम्हाला चिंता आहे. बनावट लसीचे काही दुष्परिणाम जाणवत आहेत का ? याची माहिती घ्या. तुम्ही इतके प्रयत्न करूनही हे झाले, तर तुम्ही काय करत होतात ? भविष्यात असे घोटाळे होऊ नयेत, यासाठी योजना आखली जावी.

कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलामध्ये कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालयाच्या नावाने शिबिर घेण्यात आले. या शिबिरात लसीकरणासाठी प्रत्येक नागरिकाकडून १ सहस्र २५० रुपये घेण्यात आले. या प्रकरणी रहिवाशांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या प्रकरणी अन्वेषण चालू आहे. अशा प्रकारे कुठे बनावट लसीकरण होत असल्यास मुख्य नियंत्रण कक्ष (१००), (०२२) २२६२५०२०, २२६२७९८३, २२६२३०५४ या दूरभाष क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.