इंडोनेशियामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती लपवून ठेवणार्‍या इस्लामी धर्मगुरूला ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

मुसलमानबहुल इंडोनेशियात एका मुसलमान धर्मगुरूला अशी शिक्षा होऊ शकते; मात्र भारतात ती होऊ शकणार नाही; कारण भारतात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अशांचे लांगूलचालन करत त्यांना प्रत्येक गुन्ह्यात पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात घ्या !

धर्मगुरु महंमद रिजिक शिहाब

जकार्ता (इंडोनेशिया) – येथील प्रभावशाली धर्मगुरु महंमद रिजिक शिहाब यांनी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची गोष्ट लपवल्याने त्यांना ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ‘शिहाब यांनी माहिती लपवल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या, तसेच त्यांनी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण केला’, असे न्यायालयाने शिक्षा ठोठावतांना म्हटले. शिक्षा ठोठावतांना न्यायालयाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सैनिकांनाही तैनात करण्यात आले होते. शिहाब यांचे समर्थक त्यांच्या सुटकेची मागणी करत होते. पोलिसांनी शिहाब यांच्या समर्थकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

शिहाब यांना मे मासामध्येही न्यायालयाने ८ मासांची शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी दळणवळण बंदीच्या नियमांचे उल्लंघन करून मुलीच्या विवाहासाठी मोठ्या संख्येने लोकांना गोळा केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्याच वेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. याची माहिती त्यांनी दडवून ठेवली.