आषाढी वारीच्या कालावधीत पंढरपूर (जिल्हा सोलापूर) शहरासह १० गावांत ७ दिवस संचारबंदीचा प्रस्ताव !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेनिमित्त १७ ते २५ जुलै या ७ दिवसांच्या कालावधीत पंढरपूर शहरासह परिसरातील १० गावांमध्ये संचारबंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. या काळात चंद्रभागा नदी परिसरात १४४ कलम लागू केले जाणार आहे. लवकरच याविषयीचे आदेश देण्यात येतील, असे पोलीस अधीक्षक सातपुते यांनी सांगितले. येथे २२ जून या दिवशी श्री विठ्ठल पोलीस सहकारी गृहनिर्माण सोसायटी पंढरपूरच्या भूमीपूजनासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची वर्षभरातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून आषाढी यात्रा प्रसिद्ध आहे. वारीनिमित्त राज्यभरातून, तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू येथील लाखो भाविक  पंढरपूर येथे येतात; मात्र मागील वर्षभरापासून कोरोना संसर्गामुळे यात्रा केवळ प्रातिनिधीक स्वरूपात साजरी केली जात आहे. या वर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होईल, तर पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे, तसेच या काळात सोलापूर जिल्हा, पंढपूर तालुका आणि शहर अशी त्रिस्तरीय नाकेबंदी करण्यात येणार आहे. अनुमती असलेल्या भाविकांविना अन्य कुणालाही पंढरपूर येथे प्रवेश दिला जाणार नाही.