‘साधकांची साधना आणि गुरुकार्याची वृद्धी व्हावी’, अशी तीव्र तळमळ असलेले कर्नाटकमधील धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा !

‘कर्नाटक राज्यातील साधकांना साधनेची दिशा आणि साधनेतील योग्य दृष्टीकोन देऊन साधनेत पुढे घेऊन जाण्यासाठी पू. रमानंद गौडा यांनी अनेक शिबिरे घेऊन साधकांना प्रोत्साहन दिले अन् ‘त्यांची साधना व्हावी’, यासाठी पुष्कळ तळमळीने प्रयत्न करून अनेक साधक घडवले. त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यातून जाणवलेली त्यांची गुरुकार्याची तळमळ अन् त्यांच्यातील साधकांप्रती असलेला वात्सल्यभाव इत्यादी अनेक सूत्रे शिकता आली. ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी (१९.६.२०२१) या दिवशी पू. रमानंदअण्णा यांचा ४५ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांनी साधक घडवण्यासाठी केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.

२१ जून २०२१ या दिवशी आपण ‘पू. रमानंद गौडा यांनी आयोजित केलेली विविध विषयांवरील शिबिरे’ याविषयी लिखाण पाहिले. आज या लेखमालिकेचा अंतिम भाग पाहूया.       

(भाग ३)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/488720.html
(परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘देश-विदेशांतील सर्वच धर्मप्रचारकांनी पू. रमानंद गौडा यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे धर्मप्रचाराचे कार्य केले, तर सर्वत्र अतिशय वेगाने कार्य होईल !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले. 

पू. रमानंद गौडा

५. साधकांच्या साधनेत सातत्य रहाण्यासाठी केलेले प्रयत्न

५ अ. ‘साधना आणि सेवा करतांना येणार्‍या अडचणी, त्यांवरील उपाय अन् पुढील आठवड्याचे ध्येय’, असे विषय आठवड्यातून एकदा आयोजित केलेल्या सत्संगात घेतल्यामुळे साधकांचे साधनेचे प्रयत्न वाढणे : ‘उत्तरदायी साधकांच्या साधनेत सातत्य रहावे’, यासाठी आठवड्यातून एकदा ३ घंट्यांच्या सत्संगाचे नियोजन करण्यात आले. या सत्संगामध्ये सर्वांचा व्यष्टी साधनेचा आढावा, कार्याचा आढावा, ‘साधना आणि सेवा यांमध्ये कुठे न्यून पडलो ? साधना आणि सेवा यांत काय अडचणी येतात ?’, यांविषयी चर्चा घेऊन ‘त्यात कुठे पालट करू शकतो ?’, तसेच ‘पुढील आठवड्यात काय प्रयत्न करणार ?’, असे विषय घेण्यास आरंभ केला. साधनेत सातत्य रहाण्यासाठी सर्वांना ‘प्रत्येक पुढील आठवड्यात कोणते ध्येय ठेवणार ?’, असे विचारून तसे प्रयत्न करण्यास सांगितले. साधनेत सातत्य ठेवून प्रयत्न केल्यामुळे सर्व साधकांच्या मनात ‘प्रत्येक सेवा हे माझेच दायित्व आहे’, हा विचार निर्माण झाला आणि सर्वांचा कृतज्ञताभाव अधिकच वाढला.

५ आ. ‘सर्व साधकांचाही आठवड्यातून २ वेळा व्यष्टी आढावा घेणे आणि प्रतिदिन आपापल्या व्यष्टी साधनेच्या आढावा गटामध्ये आढावा देणे’, असे चालू केल्यामुळे सर्वांचीच व्यष्टी साधना नियमितपणे चालू होणे : आता सर्व उत्तरदायी साधकांचा सामूहिक स्तरावर आठवड्यातून २ वेळा सकाळी लवकर व्यष्टी साधनेचा आढावा होतो. त्यामुळे सर्वांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले चालू झाले आणि सर्वांचे त्याविषयीचे गांभीर्यही वाढले. ‘सर्व साधकांचाही आठवड्यातून २ वेळा व्यष्टी आढावा घेणे आणि प्रतिदिन आपापल्या व्यष्टी साधनेचा आढावा गटामध्ये देणे’, असे चालू केल्यामुळे सर्वांचीच व्यष्टी साधना नियमितपणे चालू झाली. यातून ‘व्यष्टी साधना चांगली झाली, तरच समष्टीला योग्य दिशा देऊ शकतो’, हे सर्व साधकांच्या मनावर बिंबल्यामुळे सर्वांमध्ये हा पालट झाला. सर्व साधकांची सकारात्मकताही वाढली.

६. धर्मशिक्षणवर्ग आणि सत्संग यांची फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न

६ अ. धर्मशिक्षणवर्गात घेण्याचा विषय सिद्ध करून देणे : राज्यात धर्मशिक्षणवर्ग आणि सत्संग व्यवस्थित होण्यासाठी अन् धर्मशिक्षणवर्ग आणि सत्संग घेणार्‍या साधकांना विषय सिद्ध करून देण्यासाठी ४ साधकांचा एक गट केला. या ४ साधकांनी प्रत्येक १५ दिवसांतून एकदा एकत्रित येऊन धर्मशिक्षणवर्ग आणि सत्संग यांत घेण्याच्या विषयाची सिद्धता करून त्या विषयाची धारिका (स्क्रीप्ट) सिद्ध करण्यास सांगितली.

६ आ. धर्मशिक्षणवर्ग किंवा सत्संग घेणारे साधक यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे नियोजन करणे : अभ्यासवर्ग घेणार्‍या साधकांचे ‘व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे नियोजन कसे करायचे ?’, याविषयी अभ्यास करून त्यांचा प्रत्येक आठवड्याला सत्संग घेण्याचे ठरवले. त्यामुळे साधकांचे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे नियोजन योग्य पद्धतीने झाले. त्यामुळे साधकांना दिशा मिळून अभ्यासवर्गांची फलनिष्पत्ती वाढली. त्यामुळे वर्गही नियमित होऊ लागले.

६ इ. धर्मशिक्षणवर्ग किंवा सत्संग घेणार्‍या साधकांचा सत्संग घेऊन त्यात त्यांना त्यांच्याकडून होणार्‍या चुकांची जाणीव करून देऊन योग्य दिशा देणे : अभ्यासवर्ग घेणार्‍या साधकांची विषय घेण्याची गुणवत्ता वाढून तो परिणामकारक होण्यासाठी आता धर्मशिक्षणवर्ग घेणार्‍या आणि पुढे जे घेणार आहेत, त्यांना एकत्रित करून राज्य स्तरावर एक सत्संग घेण्याचे नियोजन केले. यामध्ये ‘सध्या धर्मशिक्षणवर्गात काय चुका होत आहेत ? त्याचा परिणाम काय होत आहे ?’, हे सांगून अभ्यासवर्ग घेणार्‍या साधकांना चुकांची जाणीव करून देण्यात आली आणि ‘आता पुढे कसे प्रयत्न करायचे ?’, असा विषय घेण्यात आला.

६ ई. चांगले प्रयत्न करणार्‍या साधकांना प्रोत्साहन देणे : धर्मशिक्षणवर्गासाठी जे साधक चांगले प्रयत्न करत आहेत, त्यांच्या प्रयत्नांचे अनुभव सांगून साधकांना प्रोत्साहन देण्यात आले. परिणामस्वरूप आता धर्मशिक्षणवर्गातील जिज्ञासूही सेवेला यायला लागले आहेत आणि दायित्व घेऊन ते सेवाही करू लागले आहेत.

७. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे नियोजन चांगले व्हावे आणि फलनिष्पत्ती चांगली मिळावी’, यांसाठी केलेले प्रयत्न

७ अ. हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या नियोजनात पुष्कळ चुका होत असल्यामुळे सभेचे दायित्व घेऊन सेवा करणार्‍या साधकांचा सत्संग घेणे आणि त्यांना योग्य दिशा देणे : राज्यातील सर्व जिल्ह्यांत पुष्कळ हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे नियोजन केले होते; मात्र नियोजनानुसार सभा होत नव्हत्या आणि झालेल्या सभेच्या नियोजनातही पुष्कळ चुका होत्या. त्यासाठी पू. अण्णांनी एक दिवसीय सत्संगाचे नियोजन केले. यामध्ये सभेचे दायित्व घेऊन सेवा करणार्‍या राज्य आणि जिल्हा स्तरावरील सर्व साधकांना एकत्रित करून ‘पहिल्यापासून शेवटपर्यंत सभेचे नियोजन कसे करायला हवे ?’, हे सांगितले. ‘सभांचे नियोजन चांगले केले, तर त्याचा समष्टीला आणि साधनेच्या दृष्टीने आपल्याला काय लाभ होतो ? या सेवेतून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या दृष्टीने कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयीही त्यांनी साधकांना मार्गदर्शन केले.

७ आ. ‘सभेच्या १०० टक्के फलनिष्पत्तीसाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी साधकांना मार्गदर्शन करणे : सभेचे नियोजन करतांना ‘सभेचे स्थळ कसे ठरवायचे ? संपर्क कसे करायचे ? प्रत्यक्ष त्या दिवसाचे नियोजन कसे करायचे ? १०० टक्के फलनिष्पत्तीसाठी कसे प्रयत्न करायचे ?’, असे अनेक विषय घेऊन ‘कसे प्रयत्न करायला हवेत ?’, हे त्यांनी  सांगितले. ‘सभेच्या सेवेत काय चुका होत आहेत ? त्यांचा परिणाम काय होत आहे ?’, हेही सांगितले आणि त्यासाठी सेवेची तपाससूचीही सिद्ध करून दिली. परिणामस्वरूप साधक सक्षम होऊन स्वतंत्रपणे सभेची सेवा करत आहेत. यातून ‘शिबिर घेतल्यानंतर साधकांना त्याचा किती चांगला लाभ होतो ?’, हे अनुवभता आले.’

८. रामनाथी आश्रमात झालेल्या कन्नड भाषिक साधना शिबिरासाठी धर्मप्रेमींना पाठवण्यासाठी केलेले प्रयत्न

८ अ. ‘साधना शिबिरासाठी कुणी जाणार नाहीत’, अशी साधकांची मानसिकता असणे : ‘नोव्हेंबर २०१९ मधील साधना शिबिरासाठी येऊ शकणार्‍या धर्मप्रेमींची सूची जिल्ह्यांमध्ये सिद्ध नव्हती. साधकांनाच ‘कुणी जाणार नाही’, असे वाटत होते. त्यामुळे शिबिराच्या पूर्वी काही दिवस ‘शिबिर घ्यायचे कि नाही ?’, अशी स्थिती निर्माण झाली होती.

८ आ. ‘धर्मप्रेमी रामनाथी आश्रमात गेल्यावर त्यांना साधनेची योग्य दिशा मिळेल, त्यामुळे गुरुकार्याची वृद्धी होईल आणि त्यातूनच साधकांचीही साधना होईल’, असे पू. अण्णांनी साधकांना सांगणे : पू. अण्णांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा सत्संग घेऊन ‘धर्मप्रेमींना साधना शिबिरासाठी पाठवण्यात आपण कुठे न्यून पडत आहोत ?’, असे विचारले. त्या वेळी पू. अण्णांनी ‘आपल्या राज्यातील धर्मप्रेमींना रामनाथीला पाठवतांना आपला भाव कसा असायला हवा ? वर्षभर प्रयत्न करूनही आपण त्यांना जे देऊ शकत नाही, ते रामनाथी आश्रमात त्यांना २ – ३ दिवसांत मिळू शकते. भूवैकुंठात गेल्यावर त्यांना आध्यात्मिक लाभ होऊन त्यांच्या साधनेला दिशा मिळेल. त्यामुळे पुढे गुरुकार्यातही वृद्धी होईल आणि त्यामधून आपली स्वतःचीही साधना होईल’, असे सांगून सर्वांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर त्यांनी सर्वांना धर्मप्रेमींच्या नावाची एक सूची करायला सांगून ती एका दिवसात पाठवण्यास सांगितले.

८ इ. पू. अण्णांनी केलेल्या प्रयत्नांमुळे एकूण ३५ धर्मप्रेमी रामनाथी आश्रमातील कन्नड भाषिक साधना शिबिरासाठी जाणे : धर्मप्रेमींच्या नावाची सूची मिळाल्यावर पू. अण्णांनी स्वतः तिचा अभ्यास केला. त्यांनी साधकांना या सर्व धर्मप्रेमींची भेट घेऊन त्यांना शिबिराला जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सांगितले. पू. अण्णांनी केलेल्या या प्रयत्नांमुळे रामनाथी आश्रमात होणार्‍या ३ दिवसीय कन्नड भाषिक शिबिरासाठी ३५ धर्मप्र्रेमी जाऊन आले. त्या सर्वांना साधनेची पुढील दिशा मिळाली. त्यानुसार ते तसे प्रयत्नही करत आहेत.

८ ई. राज्यातील धर्मप्रेमींसाठी मंगळुरू सेवाकेंद्रात शिबिर घेणे : ‘कर्नाटक राज्यातील धर्मप्रेमींनाही साधनेची दिशा मिळावी’, यासाठी राज्य स्तरीय साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर मंगळुरू सेवाकेंद्रात घेतले होते. ‘सेवाकेंद्रातील चैतन्य, संतांचे नामजपादी उपाय, संतांचे मार्गदर्शन आणि मिळालेली साधनेची दिशा’, यांमुळे सर्व धर्मप्रेमींनी व्यष्टी साधना करण्यास अन् समष्टी सेवेसाठीही वेळ देण्यास आरंभ केला. सर्व धर्मप्रेमींना ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ हा विषय आवडला. या शिबिरात अभियंता, उद्योगपती, प्राध्यापक, अधिवक्ता इत्यादी क्षेत्रांतील धर्मप्रेमी उपस्थित होते. या शिबिरानंतर पू. अण्णांनी सर्वांशी अनौपचारिक बोलण्यासाठी वेळ दिला. त्या वेळी सर्व जण पू. अण्णांशी मोकळेपणाने बोलले. शिबिरात आलेले अनेक जण आता साधक बनत आहेत.

८ उ. फलनिष्पत्ती

१. या शिबिरातील एक धर्मप्रेमी पू. अण्णांच्या समवेत दौर्‍यात गाडीचालक म्हणून सेवेसाठी आले होते.

२. काही धर्मप्रेमी महाशिवरात्रीसाठी लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शन आणि विक्री कक्षावर सेवेसाठी आले होते.

३. धर्मप्रेमींनी आता व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.

४. शिबिर झाल्यानंतर धर्मप्रेमी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि समाजातील परिचित यांना सेवाकेंद्र अन् साधना यांविषयी सांगत होते.

५. शिबिरात सहभागी झालेल्या एका अधिवक्त्यांनी ‘आमच्या क्षेत्रातील अधिवक्त्यांना एकत्र करून त्यांचे एक अधिवेशन घेण्याचे नियोजन करतो’, असे सांगितले. आता दुसर्‍या साधना शिबिराचे आयोजन होत आहे.

९. पू. अण्णा साधकांना साधनेसाठी करत असलेले अन्य साहाय्य !

९ अ. दौर्‍यावर असतांना समवेत असलेल्या साधकांना त्यांच्या दायित्वाची जाणीव करून देणे : पू. अण्णा जिल्ह्यांमध्ये धर्मप्रचाराला जातात, तेव्हा ते त्यांच्या समवेत काही साधकांना शिकण्यासाठी घेऊन जातात. ‘समवेत येणारे साधक कसे असायला हवेत ? त्यांचे हावभाव किंवा वेशभूषा कशी असायला हवी ? त्यांनी कसे शिकायला हवे ? दौर्‍यावर असतांना त्यांचे दायित्व काय असते ? नियोजित ठिकाणी गेल्यावर तेथे दायित्व घेऊन कसे प्रयत्न करायला हवेत ? ते कुठे न्यून पडत आहेत ?’, इत्यादींविषयी त्यांना जाणीव करून देऊन पू. अण्णा त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न करवून घेतात. ते दौर्‍यातील साधकांकडून प्रत्यक्ष कृतीही करवून घेतात.

९ आ. दौर्‍यावर असतांना जिल्ह्यातील सर्व साधकांना त्यांच्या सेवेच्या प्रकारानुसार मार्गदर्शन करणे : पू. अण्णा जिल्ह्यात गेल्यावर ‘तेथील साधकांचा आढावा घेणे, सर्व साधकांना मार्गदर्शन करणे, धर्मशिक्षणवर्गातील साधकांना मार्गदर्शन करणे, धर्मप्रेमींना मार्गदर्शन करणे, हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन करणे’, असे साधकांच्या सेवेच्या प्रकारानुसार त्यांना साधनेविषयी वेगवेगळे मार्गदर्शन करतात. या मार्गदर्शनात ते व्यष्टी आणि समष्टी साधना यांविषयीही मार्गदर्शन करतात अन् आवश्यकता असलेल्या साधकांना वैयक्तिक वेळ देऊन त्यांच्याशी बोलून त्यांना आधार देतात.

९ इ. साधकांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी वेगळा वेळ देऊन त्यांच्याशी अनौपचारिक बोलणे : पू. अण्णा जिल्ह्यात गेल्यावर साधकांच्या कुटुंबियांसाठी वेगळ्या भेटीचे नियोजन करतात. साधिकांच्या यजमानांच्या भेटीचेही ते नियोजन करतात. ते साधकांच्या कुटुंबियांशी अनौपचरिक बोलतात. त्यामुळे काही साधिकांचे यजमानही आता सेवेत आणि साधनेत सहभागी व्हायला लागले आहेत.

९ ई. जिल्ह्यातील उत्तरदायी साधकांना त्यांच्या चुका लक्षात आणून देणे, त्यांचा आढावा स्वतः घेणे आणि त्यामुळे उत्तरदायी साधकांमध्ये दायित्वाचे गांभीर्य निर्माण होणे : पू. अण्णा जिल्ह्यातील उत्तरदायी साधकांना एकत्रित करून त्यांना ‘ते कुठे न्यून पडत आहेत ?’, याची जाणीव करून देतात. त्यांच्या प्रयत्नांचा आढावा पू. अण्णा स्वतः घेतात. जिल्ह्यात समन्वयाच्या अभावाने काही चुका झाल्या, तर पू. अण्णा साधकांना त्याची जाणीव करून देतात. त्यामुळे उत्तरदायी साधकांमध्ये त्यांच्यावर असलेल्या दायित्वाचे गांभीर्य निर्माण झाले आहे.

९ उ. हिंदु राष्ट्र-जागृती सभा, कार्यशाळा किंवा शिबिर येथे सेवा करणार्‍या साधकांशी भ्रमणभाषवर बोलून त्यांना प्रोत्साहित करणे : हिंदु राष्ट्र-जागृती सभा, कार्यशाळा, शिबिर या ठिकाणी ज्यांचे चांगले प्रयत्न चालू आहेत, त्या साधकांना आधार आणि प्रोत्साहन देण्यासाठी पू. अण्णा त्यांच्याशी भ्रमणभाषवर १५ मिनिटे बोलतात आणि त्यांना काही अडचण आली असेल अन् जेथे प्रत्यक्ष जाणे शक्य असेल, तेथे पू. अण्णा स्वतःच जातात.

१०. कृतज्ञता

पू. रमानंद अण्णा हे सर्व धर्मप्रेमी, साधक आणि साधकांचे कुटुंबीय या सर्वांच्या साधनेसाठी आधारस्तंभ आहेत. ते ज्यांच्याशी बोलतात, ते सर्व जण साधना करायला लागतात. पू. अण्णांच्या बोलण्यात कुठलीही अपेक्षा नसते. परिणामी कर्नाटकातील पुष्कळ साधक, धर्मप्रेमी आणि साधकांचे कुटुंबीय साधनेमध्ये पुढे जात आहेत. ‘पू. अण्णांची साधकांवरील प्रीती आणि ते साधकांना देत असलेला आध्यात्मिक आधार’, यांमुळे साधकांना ‘पू. अण्णा सतत आपल्या समवेतच आहेत’, असे वाटते. ‘कर्नाटक राज्यात प्रसारकार्य वाढवण्यासाठी पू. अण्णांनी कसे प्रयत्न केले ?’, हे गुरुदेवांच्या कृपेमुळे लिहिण्याची संधी आम्हाला मिळाली’, यासाठी आम्ही त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. काशिनाथ प्रभु, सौ. मंजुळा रमानंद गौडा आणि श्री. गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक. (एप्रिल २०२०)

(समाप्त)

अनावश्यक विचार न्यून होऊन नामजप परिणामकारक होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे, हा उत्तम अन् प्रभावशाली उपाय असणे

‘अनावश्यक विचारांच्या समवेत नामजप केला, तर त्या नामजपाचा विशेष लाभ होत नाही. या समस्येवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याला ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे’, हा उत्तम आणि प्रभावशाली उपाय सांगितला आहे. ही प्रक्रिया योग्य प्रकारे राबवली की, आपल्या मनातील संस्कार न्यून होतात आणि पुढे अनावश्यक विचार न्यून होऊन मन अंतर्मुख होते. त्या वेळी आपला नामजप परिणामकारक होतो.’

– पू. रमानंद गौडा, कर्नाटक