परात्पर गुरुदेवांनी सांगितलेले व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे प्रयत्न तळमळीने करून मृत्यूला निर्भीडपणे सामोरे गेलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) विनया राजेंद्र पाटील !

कै. (सौ.) विनया राजेंद्र पाटील

१. सौ. विनया राजेंद्र पाटील यांचे निधन झाल्याचे समजल्यावर मन अस्वस्थ होणे आणि ध्यानमंदिरातील दत्तगुरूंच्या चित्राकडे एकाग्रतेने पहात असतांना मनाची अस्वस्थता संपणे

‘२५.३.२०२१ या दिवशी मी कुडाळ सेवाकेंद्रात असतांना सौ. विनया राजेंद्र पाटील यांचे निधन झाल्याचे समजले. तेव्हा मला धक्का बसला आणि ‘अरे, असे कसे झाले ?’, असा विचार मनात येऊन गेला. तिची लहान मुलगी (कु. राधिका) मला डोळ्यांसमोर दिसू लागली. काही क्षण माझे मन अस्वस्थ होऊन मला कै. विनया समोर दिसू लागली. नंतर मी ध्यानमंदिरात जाऊन बसले आणि दत्तगुरूंचे चित्र एकाग्रतेने पाहू लागले. तेव्हा ५ ते १० मिनिटांत माझ्या मनाची अस्वस्थता दूर झाली.

२. दत्तगुरूंचे चित्र एकाग्रतेने पहातांना मन निर्विचार झाल्यावर दिसलेले दृश्य

२ अ. मनाची निर्विचार स्थिती झाल्यावर ‘कै. विनया आनंदी आणि निर्भीडपणे यमदेवतेसमोर उभी आहे’, असे दिसणे, ‘चित्रगुप्त हातात वही घेऊन आल्याचे पाहून यमदेवाने ‘ती वही आणू नको, ती सनातनची साधिका आहे. तिला जाऊ दे’, असे सांगत असल्याचे जाणवणे : दत्तगुरूंचे चित्र एकाग्रतेने पहातांना माझे मन निर्विचार झाले आणि काही क्षणांतच मला दिसले, ‘कै. विनया हिचा तोंडवळा आनंदी आणि हसरा आहे. तिच्यासमोर यमदेवता आसनस्थ आहे. यमदेवतेसमोर कै. विनया हसतमुखाने उभी आहे. तिच्या पाठीमागे मनुष्याकृतीत पांढरा प्रकाश आहे. यमदेवता आणि कै. विनया यांचे काहीतरी बोलणे चालू आहे. तेवढ्यात यमदेवतेच्या बाजूला चित्रगुप्त हातात वही घेऊन आला. ते पाहून यमदेव चित्रगुप्ताला म्हणाला, ‘वही आणू नको. ती सनातनची साधिका आहे. तिला जाऊ दे.’ त्यानंतर मी भानावर आले आणि माझ्या लक्षात आले, ‘मी ध्यानमंदिरात आहे.’

३. मनाची विचारप्रक्रिया

३ अ. मनातील यमदेवतेविषयीची भीती नष्ट होणे : मला ‘यमदेवता’ हे नाव ऐकूनच भीती वाटते; परंतु या दृश्यात कै. विनया यमदेवतेसमोर आनंदी आणि हसतमुखाने उभी असल्याचे पाहिल्यावर माझ्या मनातील यमदेवतेविषयीची भीती नष्ट झाली. मला काहीही त्रास झाला नाही.
​त्यानंतर मी ‘मला हे दृश्य का दिसले ?’, याविषयी मनाचे निरीक्षण केले. तेव्हा ‘मनात देवाचाच ध्यास, देवाचे नाम, देवाशी अनुसंधान असतांना देवच असे दृश्य दाखवतो’, असे मला वाटले.

३ आ. कै. विनयाची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा असून ती कशातच अडकलेली नसल्यामुळेच ती यमदेवतेसमोर आनंदी आणि हसतमुखाने उभी असल्याचे जाणवणे : त्यानंतर माझ्या मनात ‘सौ. विनया यमदेवतेसमोर हसतमुख उभी कशी राहिली ? तिला भीती कशी वाटली नाही ?’, असे विचार आले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘तिची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा होती. ती नेहमी शरणागतभावात असायची. तिची व्यष्टी साधना चांगली असावी. यामुळे ती निर्भीड, हसतमुख आणि आनंदी दिसत होती, तसेच तिला कशाचीही काळजी नसल्याने ती निश्‍चिंत होती. ती कशातच अडकलेली नव्हती.’

३ इ. ‘कै. विनयाच्या लिंगदेहाला पुढे नेण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर प्रकाशरूपात तिच्या समवेत आहेत’, असे जाणवणे : तिच्या समवेत मनुष्याकृती पांढरा प्रकाशाचा गोळा होता. ‘हा पांढरा प्रकाश, म्हणजे कै. विनयाच्या लिंगदेहाला पुढे नेण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर प्रकाशरूपात तिच्या समवेत होते. प्रकाशरूपातील परात्पर गुरु डॉक्टरांना बघूनच यमदेवतेने चित्रगुप्ताला परत पाठवले असेल’, असे मला वाटले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मृत्यूसुद्धा किती आनंददायी आहे !’, हे लक्षात आले.

३ ई. ‘आपण पृथ्वीवर असेपर्यंत परात्पर गुरुदेवांनी सांगितलेले व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे प्रयत्न तळमळीने केल्यास मृत्यूचीही भीती नष्ट होते’, हे लक्षात आले.

४. कृतज्ञता 

परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे प्रारब्ध नष्ट होते आणि कळत-नकळत झालेल्या पापांचे क्षालन होत आहे. त्यासाठी आणि वरील आनंददायी दृश्य दाखवून भयमुक्त केल्याची अनुभूती दिल्यामुळे मी देवाचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.३.२०२१)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांनाडोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकटसर्वांनाच येतील असे नाही. – संपादक