वायूप्रदूषणाचा घातक विळखा !

वायूप्रदूषण सहसा हिवाळ्यात अधिक होते; मात्र गेल्या ३ वर्षांत उन्हाळ्यातही वायूप्रदूषणात वाढ झाली आहे, असे तज्ञांनी म्हटले आहे. हवेतील सूक्ष्म आणि अतीसूक्ष्म धूलिकणांत लक्षणीय वाढ झाल्याचीही माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. वायूप्रदूषण हे फुप्फुसांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर आघात करते. त्यामुळे श्वसनाच्या गंभीर विकारांना सामोरे जावे लागते. ‘वायूप्रदूषण आणि कोरोना यांचा थेट संबंध स्पष्ट झाला नसला, तरी येणार्‍या काळात कोरोनानंतर सर्वांत मोठी महामारी हवेतील प्रदूषणाच्या रूपाने येईल’, असे तज्ञांचे म्हणणे आहे. ‘लँसेट हेल्थ जर्नल’च्या संशोधनात ‘वायूप्रदूषणाचा थेट गर्भपाताशी संबंध आहे’, असे म्हटले आहे. ‘जगात ज्या भागात सर्वाधिक हवा प्रदूषित आहे, तेथे गर्भाची हानी होणे, गर्भपात होणे यांचे, तसेच मृत अर्भक जन्माला येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे’, असेही समोर आले आहे. सूर्यकिरणांपासून आपले रक्षण करणारा ओझोन वायूचा थर वायूप्रदूषणामुळे विरळ होत चालला आहे. थोडक्यात विज्ञानाने केलेल्या प्रगतीचा अपवापर मनुष्याच्या अस्तित्वावर घाला घालणारा आहे, हेच पुनःपुन्हा लक्षात येत आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पूर्वी जेव्हा माणूस निसर्गाशी सामंजस्य राखून रहात होता, तेव्हा पर्यावरण प्रदूषण आणि नैसर्गिक असंतुलन यांच्याशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती. आता मनुष्याच्या भोगवादी प्रवृत्तीने टोक गाठल्यामुळे पर्यावरणाच्या प्रत्येक घटकांना प्रदूषित करण्यास माणूसच कारणीभूत झाला आहे. वायूप्रदूषण टाळण्यासाठी यापुढील काळात उपाययोजना काढणे आवश्यक आहे. पिंपळ, वड आणि कडूलिंब यांसारखी झाडे परिसराला थंड हवामान आणि ऑक्सिजन देतात. त्यामुळे वातावरण ताजेतवाने रहाते. प्रत्येक ५०० मीटर अंतरावर अशी झाडे लावल्यास वायूप्रदूषणाला आळा बसू शकतो. वातावरणाच्या शुद्धीसाठी प्रतिदिन ‘अग्निहोत्र’ करायला हवा. वेदांमध्ये ‘यज्ञांच्या माध्यमातून व्याधी आणि प्रदूषण निवारणे’, याविषयी स्पष्ट व्याख्या आहे. या उपाययोजनांचा अवलंब करून आपल्याला भारतीय संस्कृतीतील संकल्पनांचे अनुसरण करावे लागेल. असे झाल्यास पर्यावरण प्रदूषण आणि नैसर्गिक असंतुलन यांच्याशी संबंधित कोणतीही समस्या उरणार नाही, हे निश्चित !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे