सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांनी वैशाख अमावास्या (१०.६.२०२१) या दिवशी देहत्याग केला. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दात येथे पाहूया.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले, आपल्या कृपेने माझ्या वयाच्या ८४ व्या वर्षी लिहिण्याची बुद्धी आपणच मला देत आहात. यापूर्वी अशा प्रकारचे कुठलेेच लिखाण न केल्यामुळे मला फारसे काही सुचत नाही, तरीही आपण माझ्याकडून हे लिहून घेत आहात. ‘आपल्याला अपेक्षित असे लिखाण आपणच माझ्याकडून करवून घ्या’, अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतोे.

१२ जून या दिवशी आपण पू. सामंतआजोबा यांनी ग्लॅक्सो आस्थापनात केलेल्या नोकरीविषयी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/485933.html

(भाग ३)

पू. सदाशिव सामंत

४. विवाह आणि वैवाहिक जीवन

४ अ. आई-वडिलांच्या संमतीने ओळखीतील आणि नात्यातील मुलीशी विवाह होणे : ‘वर्ष १९६४ मध्ये माझे लग्न झाले. आतेभावाच्या बायकोच्या सांगण्याप्रमाणे मुलगी ओळखीतील आणि नात्यातील होती. माझे लग्न आई-वडिलांच्या संमतीने ठरवून झाले. मुलगी ‘एस्.एन्.डी.टी.’ महाविद्यालयात साहाय्यक व्याख्याती (लेक्चरर) होती. माझा विवाह झाला, तेव्हा मला ४५० रुपये वेतन होते.

४ आ. मुलीच्या जन्मानंतर भांडुप येथे मोठे घर घेणे, सर्व भावंडांचे चांगल्या प्रकारे शिक्षण होऊन ते सर्व जण आधुनिक वैद्य होणे आणि आई-वडिलांनी केलेल्या देवाधर्माचे हे फळ असल्याचे जाणवणे : वर्ष १९६६ मध्ये मला पहिली मुलगी झाली. तिच्या जन्मानंतर साधारण १ वर्षाने आम्ही भांडुप या ठिकाणी मोठे घर विकत घेतले. ती जागा पुष्कळ मोठी (१६०० स्क्वेअर फूट) होती. आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे घरात आम्ही ५ भाऊ आणि ३ बहिणी, अशी एकूण ८ भावंडे, आई-वडील, माझी पत्नी आणि माझे कन्यारत्न, असे एकूण १२ जण एकत्र रहात होतो. या जागेत आल्यापासून सर्व सुव्यवस्थित होत गेले. भावंडांची शिक्षणे चांगल्या प्रकारे होऊन बहुतेक सर्व जण आधुनिक वैद्य झाले. आई-वडिलांनी केलेल्या देवाधर्माचेच हे फळ होते.

४ इ. पत्नीचा चांगला पायगुण आणि घर सांभाळण्यासाठी लाभलेले तिचे बहुमोल योगदान ! : माझ्या पाठची माझी लहान भावंडेही आम्हा उभयतांनी आमच्या मुलांप्रमाणेच वाढवली आहेत. या सर्वांत माझी पत्नी सौ. दिनप्रभा हिचा पुष्कळ मोलाचा वाटा आहे. आमचे लग्न झाले आणि वैवाहिक जीवनाला आरंभ झाला, त्या वेळी आमच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. घरामध्ये विद्युत् पुरवठाही नव्हता. त्यामुळे कंदील आणि दिवट्या यांचा वापर करून त्याच्या प्रकाशात अभ्यास आणि घरातील कामे करावी लागायची. एक आश्‍चर्यकारक घटना घडली. २४.१२.१९६४ या दिवशी म्हणजे माझे लग्न झाले, त्याच दिवशी घरामध्ये दिवे आले. ‘माझी पत्नी सौ. दिनप्रभा हिचा हा पायगुणच आहे’, असे माझे वडील म्हणायचे.

४ ई. पत्नीने नोकरी करत घरातील सर्व दायित्वे उत्तमरित्या पार पाडल्यामुळे आई-वडील तिच्यावर खुश असणे : एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये एकूणच सर्व परिस्थितीत स्वतः समवेत इतरांचा अधिक विचार करून त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्याचे दायित्व सौ. दिनप्रभा हिने लीलया सांभाळले. त्या वेळी आम्ही दोेघेही मिळवते असलो, तरी एकत्र कुटुंबात एकूण १२ जणांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न होता. ‘नोकरीसाठी बाहेर जाणे आणि घरी आल्यावर घरातील दायित्व सांभाळणे’, ही एक प्रकारे तारेवरची कसरत तिने अनेक वर्षे उत्तमरित्या सांभाळली. कितीतरी अडचणीचे प्रसंग आले; पण प्रत्येक वेळी तिने हे प्रसंग अत्यंत शांतपणे सोडवले आणि नंतर मला सांगितले. मी सकाळी कामाला गेल्यावर रात्रीच घरी यायचो. ती घरातील माणसांचे मनापासून करायची. त्यामुळे माझे आई-वडील तिच्यावर खुश असायचे.

४ उ. आधुनिक विचारसरणीची असूनही कठीण प्रसंगांत पत्नीने मोलाची साथ देणे आणि ही सर्व परात्पर गुरुदेवांची कृपा असल्याचे जाणवणे : आधुनिक विचारसरणी असलेल्या माझ्या पत्नीने आमच्या सांसारिक जीवनात आलेल्या कठीण प्रसंगांत कधीही अयोग्य विचार केला नाही; उलट अनेक कठीण प्रसंगांमध्ये ती माझ्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली. घरात वाद-विवाद झाले; परंतु सामंजस्याने त्यावर योग्य निर्णय घेण्यात तिचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यासाठी मी तिच्याप्रती कृतज्ञ आहे. आज या सर्व गोष्टींचा मी विचार करतो, तेव्हा ‘हे सर्व परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेमुळेच मला आणि माझ्या पत्नीला शक्य झालेे’, याची मला जाणीव होते. या सर्वांसाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

५. घरातील सर्वांनी देवाधर्माचे करणे

आमच्या घरात नियमित पूजापाठ चालू असे. त्या वेळी माझी आई २ – ३ घंटे दत्तगुरूंच्या पोथीचे वाचन करत असे. ती तिचे नित्य पूजाकर्म आटोपल्यावरच जेवत असे. वडील मला अधूनमधून निगुडकर महाराज यांच्या सत्संगांसाठी घेऊन जात होते. मी नित्यनेमाने प्रत्येक शनिवारी मारुतीच्या देवळात तेल, रुईच्या पानांचा हार आणि नारळ अर्पण करण्यासाठी जात असे. आमच्या घरामध्ये देवधर्म पुष्कळ प्रमाणात व्हायचा. प्रत्येक दत्तजयंतीला घरातील सर्व जण मुलुंडला निगुडकर महाराज यांच्या आश्रमात जाऊन आठवडाभर वीणा घेऊन ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’, हा जप करायचे.

६. पत्नी सौ. दिनप्रभाचे आजारपण

६ अ. घरातील दायित्वे आणि नोकरी, असे सर्व सांभाळतांना ताण सहन न होऊन पत्नी रुग्णाईत होणे, तिच्या दुखण्याचे निदान न होणे आणि आधुनिक वैद्यांनी ‘देवालाच प्रार्थना करा’, असे सांगणे : वर्ष १९७२ मध्ये आम्हाला दुसरी मुलगी झाली. पत्नी ‘आमच्या दोन्ही मुलींना शाळेत नेणे-आणणे, त्यांचा अभ्यास घेणे, महाविद्यालयात शिकवण्यासाठी जाणे’, यांसह घरातील सर्व व्याप सांभाळत नोकरी करत होती. दुसरी मुलगी झाल्यानंतर ३ वर्षांनी तिचे महाविद्यालयात जाणे बंद झाले; कारण तिला ताण यायला लागून तिची प्रकृती अस्वस्थ व्हायला लागली. ती रुग्णाईत झाली. तिला आधुनिक वैद्यांकडे दाखवले; पण तिच्या दुखण्याचे योग्य निदान झाले नाही. एकदा एका शनिवारी तिला आधुनिक वैद्यांकडे नेले. तेव्हा आमच्या समवेत आमची धाकटी मुलगी होती. तिने आधुनिक वैद्यांंना विचारले, ‘‘ती एवढे दिवस तुमचे औषध घेत आहे, तरी बरी का होत नाही ?’’ आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘या दुखण्यावर काही उपाय नाही. तुम्ही देवाला प्रार्थना करा.’’

६ आ. पत्नीला शिर्डीला नेणे आणि त्यानंतर पत्नीच्या आई-वडिलांनी तिला आयुर्वेदीय उपचारांसाठी त्यांच्या घरी नेणे : तेथून आम्ही शिर्डीला गेलो. पत्नीचा शिर्डीच्या साईबाबांवर फार विश्‍वास होता. तिचे आई-वडीलही साईबाबांच्या मंदिरात आले होते. ते मला म्हणाले, ‘‘आम्ही दिनप्रभाला नगरला घेऊन जातो. तिला १५ दिवस हवापालट होऊन विश्रांतीही मिळेल. पारनेरला एक आर्युर्वेदीय वैद्य आहेत. ते अशा तर्‍हेचे दुखणे बरे करतात. त्यांच्याकडे नेतो आणि त्यांनी दिलेली औषधे चालू करतो.’’ आधुनिक वैद्यांनी मला अगोदरच ‘हे दुखणे बरे होणार नाही’, असे सांगितले होते. त्यामुळे मी पत्नीच्या आई-वडिलांना म्हणालो, ‘‘ठीक आहे.’’ मग ते तेथून तिला घेऊन नगरला गेले आणि मी अन् मुलगी ठाण्याला घरी परत आलो.

६ इ. आयुर्वेदाच्या औषधाने पत्नीची प्रकृती सुधारणे, ते पाहून आधुनिक वैद्यांनाही आश्‍चर्य वाटणे आणि तेव्हा ‘ही सर्व देवाची कृपा आहे’, असे वाटणे : २ – ३ आठवड्यांनी पत्नी नगरहून घरी आली. तिची सर्व औषधे निराळी होती. पहिल्या दिवशी बेलाचे एक पान खायचे, दुसर्‍या दिवशी २ पाने खायची, असे करत २० व्या दिवशी २० पाने खायची आणि परत एक एक पान न्यून करत जायचे. त्याप्रमाणे करून ४० व्या दिवशी हे बेलपानाचे औषध थांंबवले. त्याचा गुण आला. हळूहळू तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. मग मी वेळ काढून वर्षातून एकदा साईबाबांच्या मंदिरात जाऊ लागलो. साधारणतः ३ मास झाल्यावर मी आणि पत्नीने ‘आता एकदा आधुनिक वैद्यांना प्रकृती दाखवून येऊया’, असे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे गेलो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही फार नशिबवान आहात. हे असाध्य दुखणे बरे झाले आहे. असे फार क्वचितच होते. एक लाख रुग्णांंमध्ये एकच बरा होतो.’’ ही देवाचीच कृपा ! ‘परम पूज्यांनी मला मोठी अनुभूती दिली’, त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.

७. वडिलांचे निधन

वर्ष १९९३ मध्ये छोट्याशा दुखण्याने माझे वडील गेले. ते रुग्णाईत असतांना त्यांच्या शेवटच्या दिवशी मला त्यांच्या समवेत राहून त्यांची सेवा करता आली. वडिलांच्या मृत्यूनंतर घडलेल्या काही घटनांमुळे माझा ईश्‍वरावरचा विश्‍वास दृढ झाला.

७ अ. वडिलांचे मृत्यूत्तर कार्य करतांना जवळपास एकही कावळा नसणे, ‘आई आणि आत्या यांची काळजी करू नका, आम्ही त्यांचा व्यवस्थित सांभाळ करू’, असे म्हटल्यानंतर नदीपलीकडच्या किनार्‍यावरून ५ कावळे येणे आणि त्यांनी सर्व पिंड खाणे : वडिलांचे मृत्यूत्तर कार्य करण्यासाठी आम्ही सांगलीजवळच्या औदुंबर क्षेत्री कृष्णा नदीच्या काठी गेलो. तेथे भटजींनी ५ मडक्यांमध्ये द्रोणावर भाताचे गोळे करून ठेवले. हे सर्व विधी होईपर्यंत दुपारचे १२ वाजले. दुपारचे ऊन कडक होते. भटजी मला म्हणाले, ‘‘आपले क्रियाकर्म करून झाले आहे. आता आपण कावळ्याची वाट बघायची.’’ आजूबाजूला झाडावर कुठेच कावळे दिसत नव्हते. तेव्हा भटजी मला म्हणाले, ‘‘त्यांची काही इच्छा असेल, तर तुम्ही तेथे झाडाखाली जाऊन त्याप्रमाणे सांगा.’’ मी झाडाखाली जाऊन म्हणालो, ‘तुम्ही माई (आई) आणि आत्या यांची कसली काळजी करू नका. आम्ही त्यांचा सांभाळ करू.’ नंतर नदीकडे पाहिले, तेव्हा नदीच्या पलीकडील किनार्‍यावरून ५ कावळे उडत येत होते. मी हात जोडून प्रार्थना केली. ते कावळे जवळ आले. त्यांनी मातीच्या भांड्यातून भात खाल्ला आणि ते परत उडून गेले. भटजी म्हणाले, ‘‘आता तुम्ही अनुभवले, असे दृश्य ते केवळ पुण्यात्मे असले, तरच घडते.’’

७ आ. या प्रसंगातून ‘हिंदु धर्मात सांगितलेली प्रत्येक कृती महत्त्वपूर्ण आहे’, हे मनावर बिंबणे : भर उन्हामधे आजूबाजूला कुठेही कावळा दिसत नसतांना नदीच्या पैलतिरावरून उडत येणारे ५ कावळे जसे काही प्रसाद घ्यायलाच आले होते. मला यातले काही कळत नव्हते; पण जे काही घडले, ते माझ्या मनावर मोठाच परिणाम करून गेले. मोठी माणसे आपल्याला जे काही सांगतील, ते आपण ऐकायचे. मनात कुठलेही विचार येऊ देऊ नये; कारण ते सर्व आपल्या चांगल्यासाठीच असते.

‘परम पूज्य, आजही मला ते दृश्य जसेच्या तसे डोळ्यांसमोर दिसते. मला ठाऊक आहे, ‘हे सर्व तुम्हीच केले. ही सर्व तुमचीच कृपा आहे ! या सर्व प्रसंगातून तुम्ही ‘हिंदु धर्मातील प्रत्येक गोष्ट महत्त्वपूर्ण आहे’, हे माझ्या मनावर बिंबवले.

८. आईचे निधन

८ अ. दत्तजयंतीच्या दिवशी दत्ताचा जयघोष करत असतांनाच आईचे निधन होणे : नोव्हेंबर १९९५ मध्ये आईला न्यूमोनिया झाला आणि दत्तजयंतीच्या दिवशी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा जयघोष करत असतांना तिचा प्राण गेला. दोन दिवसांनी मी औदुंबरला भटजींकडे गेलो. ते म्हणाले, ‘‘दत्तजयंतीला पुण्यात्मेच देह ठेवतात. पितर त्रास देणार नाहीत !’’

८ आ. आईचे क्रियाकर्म करतांना आलेली अनुभूती : आईच्या १० व्या दिवशी कावळा पानाला स्पर्श करेना. तेव्हा पत्नी म्हणाली, ‘‘आज गुरुवार आहे. आई उपास कडक करायच्या; म्हणून मला वाटते, ‘आपण नुसती साबुदाण्याची खिचडी पानावर ठेवूया.’’ त्याप्रमाणे साबुदाण्याची खिचडी करून मी आणि पत्नी पान घेऊन खाली गेलो. झाडाखाली ती खिचडी ठेवली आणि कावळ्याने लगेच स्पर्श केला.

‘या पितरांसंबंधीच्या सर्व कृती फार महत्त्वाच्या असून उपवासाचा दिवसही ते पाळतात’, हे या प्रसंगातून परम पूज्यांनी मला शिकवले. खरेच, हे सर्व अगम्य आहे. ‘अशा आई-वडिलांच्या पोटी आमचा जन्म झाला आणि त्यामुळे आमच्यावर चांगले संस्कार झाले’, यासाठी मी परम पूज्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्या आयुष्यात असे निरनिराळे प्रसंग आणून मला सतत मार्गदर्शन केले’, असे आता मला वाटत आहे.’

(क्रमशः)

– (पू.) श्री. सदाशिव सामंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.९.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक